राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नंतर आता दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तालुक्यातील वरवंड येथील एका गुऱ्हाळावर प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे. अशी माहिती प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी सर्जेराव भोई यांनी दिली.
दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळचालक व मालक भेसळयुक्त गुळ तयार करीत असल्याची माहिती मिळाल्याने मागील काही दिवसांपूर्वी पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाने केडगाव व दापोडी परिसरातील चार गुऱ्हाळांवर छापा टाकून कारवाई केली होती.
ही कारवाई सुरू असतानाच आता पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लास्टिक, घाण किरकचरा व हवेचे प्रदूषण करणारे घातक असे साहित्य जाळुन प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळांवर कारवाईचा बडगा उगरला आहे. तालुक्यातील वरवंड येथील वरवंड – कानगाव रोडवर असलेल्या एका गुऱ्हाळावर प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
यावेळी लोकवस्तीत असलेल्या या गुऱ्हाळाजवळ प्लास्टिक व टायरचे कचरा जाळून राहिलेले काही अवशेष असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या गुऱ्हाळावर प्लास्टिक व टायरचे साहित्य तसेच घातक केरकचरा जाळला जात असल्याचे स्पष्ट झाले असून याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती पुणे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी सर्जेराव भोई यांनी दिली. दरम्यान दौंड तालुक्यातील प्लास्टिक चपला केरकचरा व घातक असेच साहित्य जाळुन प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी भोई यांनी दिली.