सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शासनाच्या मराठी शाळेतील पटाचे कारण पुढे करत सरकारी शाळा शासन बंद करण्याच्या तयारीत असल्याच्या पार्श्वभूमीवर तेजपृथ्वी ग्रुपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गोरगरिबांसाठीच्या मराठी शाळा बंद करत शिक्षण सम्राटांना मोठे करायचे असा शासनाचा उद्देश आहे काय ? असा सवाल करत मराठी शाळा बंद करून गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, बहुजनांच्या मुलांच्या शिक्षणाशी खेळू नका.. मराठी शाळा बंद झाल्यास बहुजन समाजाला बरोबर घेऊन तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात यांनी दिला आहे.
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट 20 पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद करायच्या असा शासनाचा उद्देश आहे. याबाबत सध्या शासनाने मराठी शाळांचा सर्वे करण्याचा तोंडी आदेश दिला आहे, याचा अर्थ गोरगरिबांच्या, बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या मुलाने शिकायचे नाही. तर फक्त श्रीमंताच्या मुलांनी शिकायचे. त्यामुळे मराठी शाळा बंद करून शिक्षण सम्राट मोठे करायचे असा शासनाचा उद्देश दिसतो आहे. शासनाच्या भूमिकेवर तिव्र नाराजी व्यक्त करत तेजपृथ्वी ग्रुपने शासनाच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
शासनाच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अनिता खरात यांनी दिला असून याबाबतचे निवेदन त्यांनी इंदापूर येथे इंदापूर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्हा शिक्षणधिकारी, तसेच इंदापूर पोलीस निरीक्षक व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहे.
यावेळी बोलताना अनिता खरात म्हणाल्या की, जर शासनाने मराठी शाळा बंद केल्यास गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावला जाणार आहे. शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शासनाने व शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. अशी विनंती खरात यांनी केली आहे. मराठी शाळा बंद करून गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाशी खेळू नका याचे परिणाम खूप वाईट होतील.गरीब गरीबच होईल व श्रीमंत श्रीमंतच होईल, हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही.
यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास तेजपृथ्वी ग्रुप तयार आहे, या वेळी गणेश शिंगाडे, उद्योजक लक्ष्मण वाघमोडे,
अर्चना गोरड, रूपेश वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.