दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उपपदार्थ निर्मिती न करणाऱ्या साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन 3000 रुपये दर द्यावा व साखरेसोबतच उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांनी प्रति टन ऊसाला 4000 रुपये द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटने निवेदनाद्वारे साखर आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात रयत क्रांती संघटनेच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने व न्यायालयीन लढा दिल्यानंतर ऊस उत्पादकांना आर्थिक न्याय मिळाला आहे. सन २००१ ते सन २०१५ अशा पंधरा वर्षाच्या संघर्षानंतर पूर्वीची एसएमपी व आत्ताची एफ आर पी एक रक्कमी मिळण्यास ऊस उत्पादक व शेतकरी संघटना यांना यश आले आहे.
शिवाय उसावरील झोनबंदी उठवणे व ऊस बिलातून होणारी बेकायदेशीर कपाती परतीची ठेव, बिन परतीची ठेव, साखर संकुल निधी, मुख्यमंत्री निधी, भूकंप निधी, अशा बेकायदा वसुली सुद्धा मोठ्या संघर्षानंतर बंद झाल्या आहेत. सन २०१९ नंतर पुन्हा एकदा साखर कारखानदार एक रक्कमी एफ आर पी व आर एस एफ देण्यात टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे साखर कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी व संघटना यांच्यामध्ये संघर्ष आंदोलने होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
एफ आर पी व आर एस एफ पैकी जी रक्कम जास्त असेल ते देणे व ती कायदेशीर एकरकमी १४ दिवसाच्या देणे बंधनकारक आहे. त्यामुळे चालू गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाची एफ आर पी व आर एस एफ न देणाऱ्या साखर कारखान्यावर आर आर सी ची कारवाई करून शेतकऱ्यांचे देणे देण्यात यावे. उसाच्या रिकव्हरीनुसार निघणारी कारखाना निहाय एफ आर पी हा काही उसाचा अंतिम बाजार भाव नाही.
कारण आरएसएफ प्रमाणे महसूल उत्पन्नातील वाटा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. साखर निर्मिती सोबत साखर कारखानदार आता वेगवेगळ्या उप पदार्थाची निर्मिती करतात. साखर,बगॅस, को-जन, डिस्लरी, इथेनॉल, बी हेवी मळी, सॅनिटायझर असे उपपदार्थ निर्मिती मधून मिळणारे आर्थिक उत्पन्नातील वाटा कारखानदार शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे उपपदार्थ निर्मिती न करणारे व उपपदार्थ निर्मिती करणारे साखर कारखान्यांची वर्गवारी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा बाजार भाव मिळावा.अशी मागणी
रयत क्रांती पक्षाच्या वतीने केली.
याबाबत पुणे साखर संकुल कार्यालयात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक पगार, शिवनाथ जाधव, भानुदास शिंदे, दीपक भोसले, सुहास पाटील, अजय बागल, सूर्यकांत काळभोर तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.