राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला सातबाऱ्यावरील ब्लॉक काढून देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार वसंतराव शिंदे (वय – 34 पद – महसूल सहायक, वर्ग-3 तहसील कार्यालय ,दौंड, जि. पुणे) असे या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची पुनर्वसित वाटप झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील भोगवटा वर्ग २ हा शेरा कमी करून भोगवटा वर्ग १ या शेऱ्याची अंमलबजावणी करण्याकरिता आणि सातबाऱ्यावरील ऑनलाइन ब्लॉक काढून देण्यासाठी महसूल सहाय्यक तुषार शिंदे यांनी ५ हजार रुपयांची मागणी संबंधित शेतकरी यांच्याकडे केली होती.
तडजोडीअंती शिंदे यांना ४ हजार रुपये देण्याचे ठरले होते. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी ( दि.१०) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली असता शिंदे याने लाच मागितल्याचे दिसून आले.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसीलदार कार्यालयात सापळा रचून महसूल सहाय्यक तुषार शिंदे याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.