बारामती – महान्यूज लाईव्ह
काळ आला की, तो कशाही रुपात येतो.. कोणी वाहन आडवे येऊ नये यासाठी रस्त्याला आडवा लावलेला लोखंडी अॅंगल तोडून भरधाव दुचाकी आली आणि शांतपणे कडेवर बसलेल्या बाळाला त्याची एवढी जोरदार धडक बसली की, वाढदिवसाच्या दिवशीच तीन वर्षीय बाळाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना बारामतीत घडली.
बारामतीतील इंदापूर रस्त्यावरील शिवम हॉटेलसमोर ही घटना काल रात्री घडली. अरद थोरात या तीन वर्षीय चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी दौंड तालुक्यातील संकेत प्रकाश खळदकर यास बारामती शहर पोलिसांनी अटक केली.
बारामतीत शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे बौध्द युवक संघटनेने आयोजित केलेला कार्यक्रम पाहण्यासाठी सटवाजीनगर येथे राहणाऱ्या प्रिती प्रमोद थोरात या त्यांच्या तीन वर्षीय अरदला घेऊन आल्या होत्या. प्रिती या त्यांच्या मामी शुभांगी कांबळे यांच्यासह अरदला घेऊन निघाल्या. त्यांनी बसस्थानक चौक ओलांडला. तेव्हा तिथे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये किंवा वाहतूक बंद आहे हे दाखविण्यासाठी लोखंडी अॅंगल रस्त्यावर आडवा लावला होता, तो ओलांडून त्या आतमध्ये रस्त्याने जात होत्या.
तेवढ्यात पाठीमागून एक दुचाकीस्वार अत्यंत वेगाने तेथे आला. त्याने आडव्या लोखंडी अॅंगलला ठोस मारली. यात प्रिती यांची मामी शुभांगी कांबळे यांच्या पायाला व अरदला जोरदार धडक बसली.
यात अरदच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली. अरदचा वाढदिवस त्याच दिवशी होता. याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात सर्वांना मोठा धक्का बसला.