मुंबई- महान्यूज लाईव्ह
निवडणूक आयोगाने आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुचवलेल्या पर्यायातील एक पर्याय म्हणजे शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे या नावाला मान्यता दिली, तर मशाल, उगवता सूर्य व त्रिशूल या चिन्हांपैकी मशाल हे चिन्ह आयोगाने मंजूर केले. दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मंजूर केले, मात्र त्यांनी आयोगाकडे अगोदर दिलेले चिन्हांचे पर्याय बाजूला करून ठाकरे यांच्याच उगवता सूर्य, गदा व त्रिशूल हे तीन पर्याय दिले होते, ते आयोगाने नाकारले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाबद्दल राज्यभर दोन दिवसांपासून बरीच चर्चा झडत असताना आता निवडणूक आयोगाने नाव देताच राज्यभरात सोशल मिडीयावर उध्दव ठाकरे यांच्या मशालीच्या चिन्हाच्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी पसंती दिल्याचे दिसत आहे. आज रात्री अनेक ठिकाणी मशालीचे स्टेटस ठेवले गेले होते.
दरम्यान निवडणूक आयोगाने आज उध्दव ठाकरे यांना शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) हे नाव वापरण्यास मान्यता दिली. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यास मान्यता दिली. तर दुसरीकडे ठाकरे यांना मशालीचे चिन्ह व सध्यातरी शिंदे यांचे पर्यायी कोणतेही चिन्ह नाही अशी स्थिती करून ठेवली आहे.
३ नोव्हेंबर रोजी राज्यात पूर्व अंधेरी येथील पोटनिवडणूक होत आहे, या निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमदेवारी दिली आहे, तर भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणूक लढविणार आहेत.
दरम्यान शिंदे गटाने अगोदर निवडणूक लढण्याचे ठरवले नव्हते. मात्र शिवसेनेच्या मतात विभागणी झाली, तरच भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी गणिते असल्याने आता शिंदे गटही अंधेरीच्या निवडणूकीत उतरण्याची चिन्हे आहेत.