बारामती महान्यूज लाईव्ह
भारतातील प्रशासन व्यवस्था प्रत्येकवेळी टिकेचेच लक्ष्य बनेल असे काही नाही.. प्रशासनातही अनेक अधिकारी आहेत असे की, ज्यांना कामे वेळेत व्हावीत असे मनापासून वाटते.. जसे की, पासपोर्ट विभागाचे अधिकारी अर्जून देवरे..! बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी केलेल्या एका ट्विटला तत्परतेने प्रतिसाद देत त्यांनी भारतीय संघाच्या खेळाडूचा पासपोर्ट अवघ्या काही क्षणात हातात दिला आणि त्याच्या निवडीचा व परदेशात खेळण्यासाठी जाण्याचा मार्गही मोकळा केला.
ही कहाणी आहे, बाबुर्डी गावातील प्रणव पोमणे यांची..! प्रणवची थायलंड येथे होत असलेल्या आयकेएफ -ओशियाना कार्फबॉल स्पर्धेसाठी निवड झाली ाहे. मात्र त्याच्या हातात पासपोर्ट नसल्याने व तो मिळण्यास काही अवधी जाईल अशी शक्यता असल्याने त्याच्यापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाला. मग अशावेळी त्याचे बंधू व गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा केला व एक ट्विट केले.
पासपोर्ट विभाग, तसेच पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जून देवरे व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याची तातडीने दखल घेतली. अगदी दोन तासातच ही प्रक्रिया पूर्ण करीत डॉ. देवरे यांनी प्रणवला थेट कार्यालयातच बोलावून घेतले आणि त्याच्या हातात पासपोर्ट दिला. या सुखद धक्क्याने प्रणवलाही भरून आले. ज्ञानेश्वर पोमणे यांनी डॉ. देवरे व खासदार सुळे यांचे आभार मानले.