बारामती महान्यूज लाईव्ह
कालवा अस्तरीकरणाच्या मुद्दयावर शेतकऱ्यांच्या आडून राजकारण करणाऱ्या भाजपला माळेगाव, सोमेश्वर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या निमित्ताने अजित पवार यांनी आक्रमक शैलीत फटकारले. निरा डाव्या कालव्याचे पाणी याच भाजपने बंद केले होते, तेव्हा हे नौटंकीवाले कोठे गेले होते असा सवाल करीत अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर काहीही बोलतात, महागाई, वेदांतावर का विचारायला जात नाहीत, आपल्या नेत्यांना? असा सवाल केला.
माळेगाव कारखान्यावर अजित पवार यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, जेव्हा मी पणदरे येथे गेलो होतो, तेव्हा मला या पाझराबद्दल व होणाऱ्या दलदलीबद्दल शेतकऱ्यांनी विचारणा केली. त्याचदरम्यान भाजपची सत्ता होती. तेव्हा तर बंद पाईपमधून पाणी नेण्याचा प्रस्ताव त्या सरकारने मांडला होता.
त्याला आपण कडाडून विरोध केला. त्यानंतरही ते भाजपवाले गप्प बसले नाहीत. त्यांनी निरा डाव्या कालव्याचे पाणीच बंद केले. हे पाणी कायमचे बंद झाले असते, तर इकडे उन्हाळ्यात धुरळा झाला असता. ही वस्तुस्थिती माहिती नाही का?
योगायोगाने आपले सरकार आले. तीन पक्षाच्या या सरकारमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही साथ दिली आणि मग जलसंपदामंत्री जयंत पाटील, नितीन राऊत यांना बरोबर घेऊन रात्रीचा दिवस करून कायदा केला, जलआयोगाकडून मान्यता घेतली. सारे रितसर केले. आता कोणीही यात फेरबदल करू शकणार नाही. एकतर्फी तर करूच शकणार नाही.
मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की, तेव्हा हे नौटंकीवाले कोठे गेले होते? मी आजवरच्या राजकारणात शेतकऱ्यांचे नुकसान केले नाही. आयुष्यात कधीही करणार नाही. जर एखाद्या शेतकऱ्याने कालव्याच्या कडेला खोदलेली विहीर आणि त्यातून नेलेले पाणी असेल आणि कालवा अस्तरीकरण झाल्यानंतर जर ते पाणीच गेले, तर मला तरी हे शेतकरी सोडणार आहेत का? यांचे नुकसान करायला मी एवढा दुधखुळा आहे का?
हे भाजपवाले आजवर कधी आपल्या नेत्याला भेटायला गेलेत का? वेंदाता फॉक्सकॉन का गुजरातला गेला? महागाई वाढलीय, ती बंद करा, कमी करा असा प्रश्न विचारायला ते भाजपच्या नेत्या्ंकडे कधी गेले होते का? असाही सवाल पवार यांनी विचारला.
पाझर वाढतोय, त्यामुळे कालव्याचे आवर्तनही लांबत आहे, जर यापुढील काळात ते आवर्तन लांबले, तर मला आणि दत्तात्रेय भरणेंना जबाबदार धरू नका. अर्थात जर शेतकऱ्यांचा होकार असेल, तरच अस्तरीकरण करू, अन्यथा नाही असाही सल्ला पवार यांनी दिला.