भिगवण – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील शेतकऱ्याने खासगी सावकारांकडून १३ लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याजासह २१ लाख दिल्यानंतरही सावकार खरेदीखत करून दिलेली शेतजमीन परत करत नसल्याने व जीवे मारण्याची धमकी देत असल्याने या शेतकऱ्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यावरून भिगवण पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भिगवण पोलिसांकडे प्रविण दिलीप मुळीक (रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) या शेतकऱ्याने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली विलास शिरसट, गणेश वसंत राजपुरे, रवींद्र बाळासाहेब शिरसट (तिघेही रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) व प्रताप शिवाजीराव तावरे (रा. माळेगाव ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली थोडक्यात माहिती अशी, प्रविण मुळीक यांनी आर्थिक कारणास्तव वरील सावकारांकडून १३ लाख रुपये प्रतिमहिना ३.५ टक्के व्याजदराने घेतले होते. त्या बदल्यात मुळीक यांनी अडीच एकर शेतजमीन सावकारांना खरेदीखत करून दिली होती.
व्याजासह रक्कम परत मिळताच ही जमीन परत करण्याचे ठरले होते. त्यानुसार मुळीक यांनी व्याजासह या रकमेचे २१ लाख रुपये दिले. व्यवहार पूर्ण झाल्याने त्यांनी सावकारांकडे शेतजमीन मागितली. मात्र सावकऱ्कायांच्रांनी मुळीक व त्याच्या वडीलांना शिवीगाळ व दमदाटी केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावरून मुळीक यांनी भिगवण पोलिसांकडे दाद मागितली. पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास भिगवण पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.