नाशिक महान्यूज लाईव्ह
नाशिकमधील नाशिक-औरंगाबाद हायवेवर झालेल्या बस अपघातात १२ जणांचा कोळसा झाला. अनेकांची घरे उध्वस्त झाली…पण याही आपत्तीत एक गोष्ट सर्वांच्या डोळ्यात भरली.. वाशिम जिल्ह्यातील पूजा मनोज गायकवाड या २७ वर्षीय महिलेने तिच्या दोन मुलांना पेटत्या बसमधून सुखरूप बाहेर काढल्याची ही कहाणी..!
या बसमध्ये पूजा गायकवाड ही महिला तिच्या १९ वर्षीय मामेभाऊ आणि आठ व दोन वर्षांच्या दोन मुलांसह प्रवास करीत होती. चालकापासून तिसऱ्या रांगेत बसलेली पुजा देखील साखरझोपेत होती. मात्र ती आश्चर्यकारकरित्या नाही, तर तिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व तत्परतेने वाचली व आपल्या कुटुंबांचेही तिने प्राण वाचवले.
तिनेच या घटनेचा थरार सांगितला. हे चौघेजण मुंबईला जाण्यासाठी या बसमध्ये बसले होते. झोपेत असतानाच अचानक मोठा आवाज झाला. सर्वांना हादरा बसल्याने सारे खडबडून जागे झाले. समोर पाहतो, तर टायर फुटल्याचा आवाज आला आणि अचानक आगीचे लोळ दिसले.
कोणाला काहीच कळत नव्हते. सगळीकडे फक्त आरडाओरडा सुरू होता. बसचा दरवाजा एकाने उघडण्याचा प्रयत्न केला, तर तो उघडला नाही. मग पूजा हिने खिडकीची काच फोडली. अगोदर मामेभाऊ गणेश खाली उतरला. मग दोन्ही मुलांना पूजा हिने गणेशकडे खिडकीतून खाली सोडले. मग खिडकीतून बाहेर तिने उडी मारली.
त्यावेळी काही स्थानिक लोकांनाही मदतीसाठी धावाधाव केली. पूजा हिने सांगितलेली एक गोष्ट मात्र अंगावर काटा आणणारी होती. आम्ही आमच्या डोळ्यासमोर आमचे मरण बघितले. जणू आमचा पुन्हा नव्याने पुनर्जन्म झाला. मात्र आमच्यासमोर काही वेळापूर्वी सोबत प्रवास करणारे त्या आगीत अक्षरशः कोळसा होताना आम्ही पाहिले, ते कधीच विसरू शकणार नाही.