महान्यूज वेदर अपडेट
राज्यातील काही जिल्ह्यांना उद्यापासून तीन दिवस पावसाचा फटका बसणार आहे. पुण्यासह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट दिला असून गडगडाट व वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
९ ऑक्टोबर रोजी राज्यातील पुणे, सोलापूर, सांगली, नाशिक, पालघर, अहमदनगर, जालना, औरंगाबाद, नंदूरबार, धुळे, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवला असून हा पाऊस ११ ऑक्टोबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याचे संचालक के.एस. होसळीकर यांनी यासंदर्भात ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार ८ ऑक्टोबर रोजीसाठी जो अंदाज वर्तवला होता. त्यानुसार ठाणे, मुंबई, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस पडलेला आहे. दरम्यान ११ ऑक्टोबरनंतर राज्यातील मोसमी पाऊस परतेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ११ ऑक्टोबरनंतर राज्यात थंडी परतण्याची चिन्हे आहेत.