पुणे महान्यूज लाईव्ह
राजकारणातील गंमतीजमती काही काळानंतर लोकांपर्यंत पोचतात.. महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून उलथवून टाकण्यासाठी शिवसेनेतच अंतर्गत फाटाफूट झाल्याचे भाजपने कितीही सांगितले तरी काल खुद्द मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच बोलता बोलता याची कबुली दिली आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले.
पुण्यात बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी हे सरकार उलथवणे सोपे नव्हते याची कबुली देतानाच आम्ही दोन वर्षे प्लॅनिंग करत होतो, ४० आमदारांना बाहेर काढणे सोपे नव्हते अशी स्पष्टोक्ती केली.
राज्यातील सत्तातंराचा भाजप नेते शिंदे गटावर टोलवत होते. आतापर्यंत भाजपचा एकही नेता या फूटीत आमचा हात असल्याचे सांगत नव्हता. मात्र आता हे बिंग फुटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या या फाटाफूटीला अंगावर घेत नव्हते. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असून त्यांनी अभद्र युती मान्य नसल्याने हा उठाव केल्याचे सांगत होते. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या साऱ्याच गोष्टींना छेद देत यामागे भाजपचीच रणनिती असल्याचे थेटच सांगितले आणि भाजपचीच नाही, तर शिंदे गटाचीही गोची झाली.
त्यामुळे दिपक केसरकर यांनी घाईघाईत माध्यमांपुढे येऊन असे काहीही नव्हते, आमचे कोणतेही प्लॅनिंग नव्हते, आमचा हा स्वयंस्फूर्तीने केलेला उठाव होता असे सांगितले. मात्र केसरकर यांनी हे स्पष्टीकरण देईपर्यंत बराच काळ झाला होता. ज्यांच्यापर्यंत हे म्हणणे पोचायचे, तिथपर्यंत पोचले होते.
दरम्यान कोल्हापूरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी हे जगजाहीरच होतं. हे वेगळं सांगायची गरजच काय? असा प्रतिप्रश्न करीत भाजपला पुन्हा कोंडीत पकडले. अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासून ते सरकार पाडण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरूच होते. त्यांचे सरकार आले नाही, या भावनेने मग त्यांनी हे सरकार पाडण्याचे उद्योग सुरू केले होते अशी पुष्टी जोडली.