प्रियंकाला स्वर्गीय रुक्मिणी शेळके स्मृती प्रित्यर्थ मिळाली सायकल भेट.
विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – आपत्तीच्या काळात अंगावर वीज पडून वडील गंभीर जखमी झाले.. घरावर जणू आभाळ कोसळले.. खायचेच वांदे तिथे बाकीच्या गोष्टींना जागाच उरली नव्हती.. पण गावाने हात दिला.. मदत केली.. कालपरवा चिमुकल्या प्रियंकाला सायकलही दिली.. त्या कुटुंबाची सर्व माहिती खासदार सुप्रिया सुळेंना दिल्यानंतर त्यांनीही तिचे शिक्षण अर्धवट थांबू नये यासाठी आश्वासन दिले..
निरावागजच्या प्रियंका साहेबराव पवार हिच्या शिक्षणाची बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रियांकाच्या निरावागज येथे भेट घेऊन शिक्षणाची जबाबदारी उचलल्याची माहिती सुनिल देवकाते यांनी दिली.
शिक्षणापासून वंचित असणाऱ्या प्रियांका साहेबराव पवार ही मुलगी प्राथमिक शाळा निरावागज येथे शाळेत शिकते. प्रियंकाच्या पालावरती तीन महिन्यापूर्वी वीज कोसळली. वडील साहेबराव पवार यांचे अर्ध शरीर भाजून निघाले. साऱ्या घराचे कामच थांबले. मग गावकऱ्यांनी औषधोपचार केले. या कुटुंबाला जगण्यासाठी जीवनावश्यक साहित्य, अन्नधान्य, तंबू, नवीन कपडे, पलंग सर्वकाही लोकवर्गणीतून दिले. साहेबराव पवार ठणठणीत बरे झाले.
गावकऱ्यांनीही वळून मागे पाहिले नाही. पिढ्यानपिढ्या शिक्षणासाठी उपेक्षित असणाऱ्या या लोहार कुटुंबातील प्रियंकाला, जिने शाळेचे कधी दारच पहिले नव्हते, तिला शाळेत प्रवेश मिळवून दिला आणि प्रियंका साठी मदतीचे अनेक हात पुढे आले.
प्रियंकाला गावकऱ्यांनी शाळेसाठी लागणारे स्कूल बॅग, शालेय साहित्य, ड्रेस हे शालेयपयोगी साहित्य दिले. त्याचबरोबर आर्थिक मदतही करण्यात आली. परंतु तिच्याबरोबरची मुले सायकल वरती शाळेत येतात. तिचीही शाळेत सायकल वरती जाण्याची इच्छा होती आणि ही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच काम स्वर्गीय रुक्मिणी बबनराव शेळके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते व शिवराज जाचक यांनी पूर्ण केली.
तिला नवी सायकल बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या शुभहस्ते भेट दिली. प्रियंका पवारला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले. तिने देखील सुळे यांना सायकल चालवून दाखवली. सुप्रिया सुळे यांनी तिला शिक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. सुप्रिया सुळे यांनी दखल घेतल्याबद्दल गावकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचेही आभार मानले.
यावेळी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, मदन देवकाते, सरपंच दत्तात्रेय भोसले, संजय देवकाते, गणपत देवकाते, सोमनाथ भोसले, चंद्रराव देवकाते, गुलाबराव देवकाते, जयपाल देवकाते, संजय सागडे उपस्थित होते.