अनिल गवळी – महान्यूज लाईव्ह
पुणे – महाविकास आघाडी सरकारमधील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी मंत्री आशिष देशमुख यांच्यासह बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रश्मी शुक्ला यांना शिंदे सरकार सत्तेवर येताच क्लिन चिट मिळाली आहे. राष्ट्रवादीने हे अपेक्षितच होते अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांनी क समरी रिपोर्ट दाखल करून न्यायालयाकडे क्लोजर रिपोर्टची मागणी केली आहे. त्यामुळे हे अतिशय गंभीर प्रकरण आता फाईलबंद होणार आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शुक्ला यांनी वेगवेगळ्या नावांनी व कारणांनी संबंधित नेत्यांचे फोन रेकॉर्ड केले होते. विशेष म्हणजे अंतर्गत राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार शुक्ला यांनी इतरही बड्या नेत्यांचे फोन कॉल टॅपिंग केले होते अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे ह प्रकरण अतिशय गांभिर्याने घेतले गेले.
शुक्ला या सीआयडीच्या प्रमुख असताना त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव अमजद खान, तत्कालीन राज्यमंत्री बच्चु कडू यांचे नाव समशेर बहाद्दूर खान असे दिले होते. तर माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचीही टोपणनावे देऊन ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये असल्याचे सांगून त्यांचे फोन टॅप केले होते. हे कॉल रेकॉर्ड शुक्ला यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पुरवल्याचा संशय त्यांच्यावर व्यक्त करण्यात आला होता.
तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांना राज्य सरकारने विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या चर्चेनुसार तपासणीसाठी नियुक्त केले होते. त्यातील अहवालानंतर शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर नुकतीच शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या चुकीसाठी माफ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा तपास सीबीआय़मार्फत केला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
शुक्ला यांच्या विरुद्ध भारतीय तार अधिनीयम कलम 26 नुसार बेकायदा दूरध्वनी अभिवेक्षण (फोन टॅपिंग) प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता.