राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड – पुणे जिल्ह्यातील यवत, जेजूरी, सासवड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत महागड्या चारचाकी व मालवाहतूक गाड्यांचे सायलेन्सर चोरणारी टोळी यवत पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केली असून त्या टोळीकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर एकूण चार गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणले आहेत.
तालुक्यातील यवत भुलेश्वर मार्केटसमोर सतीश द्वारकादास लोंढे (वय ४८) यांनी श्री भुलेश्वर गॅस एजन्सीसमोर त्यांचा मारुती सुझुकी कॅरी मॉडेलचा टेम्पो ( क्रमांक एम.एच. ४२ बी. एफ. ००५४) उभा केला होता. त्या टेम्पोचा ५० हजार रुपये किंमतीचा सायलेन्सर नटबोल्ट खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. त्याची नोंद यवत पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी झाली होती.
यवत पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने यवत परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डवरील संशयित आरोपी तपासले. त्यांची चोरीची पध्दत तपासल्यानंतर व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरून संशयित आरोपीची माहिती घेण्यास सुरवात केली.
३ ऑक्टोबर रोजी यवत गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली की गणेशनगर धायरी येथील रोहित अडसूळ याने त्याचा साथीदार गौरव होगले याचे सोबत हा सायलेन्सर चोरीचा गुन्हा केला आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने गणेशनगर धायरी येथे जाऊन संशयित रोहित रंगनाथ अडसूळ (वय १९ रा.गणेशनगर धायरी मुळ रा.तडवळ ता.जि.उस्मानाबाद) यास ताब्यात घेतले व त्याच्याकडे अधिक चौकशी केली.
तेव्हा त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र नामे गौरव होगले याच्यासोबत केला असल्याची कबुली दिली व चोरून आणलेले सायलेन्सर हडपसर येथील भंगार व्यावसायिक २)तसब्बूर युसूफ मलिक (सध्या रा.रामटेकडी मूळ रा. मुंडली ता.जि मेरठ राज्य उत्तर प्रदेश) याला विकले असल्याचे सांगितले. त्यासही या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले. या संशयित आरोपींनी यवत, सासवड, जेजुरी या परिसरातील एका मारुती सुझुकी कॅरी टेम्पोचा व तीन मारुती सुझुकी इको गाडीचे एकूण ४ गुन्हे केले असल्याचे सांगितले.
दरम्यान या गुन्हयातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपींना दौंडच्या न्यायालयात हजर केले असता, त्यांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस पोलीस हवालदार कृष्णा कानगुडे, निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, गणेश कुतवळ सायबर पोलीस यंत्रणेचे पोलीस हवालदार सचिन गायकवाड, पोलीस मित्र निलेश चव्हाण आदींनी केली.