मुंबई- महान्यूज लाईव्ह
आठवीपर्यंत परिक्षा नाही, त्यामुळं पोरं नापास होत नाहीत.. मग शाळाही निवांत आणि आईबापही निवांत…मग पोरं नववीत गेल्यावर वाचायलाही येत नाही… अशी जी चर्चा सध्या सगळीकडे होत आहे, त्याची कुठेतरी दखल शिंदे सरकारने घेतली आहे असे दिसते.. कारण आज दिपक केसरकर यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. शिक्षणतज्ज्ञांशी सरकार चर्चा करीत असून त्यातील अंतिम निर्णयानुसार तिसरीपासून परिक्षा सुरू करण्याचे सरकारच्या मनात असल्याचे समजते.
आज शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकरांशी पुण्यात बोलताना याविषयीचे संकेत दिले. तिसरीपासून परीक्षा सुरू करण्याचे सरकारच्या मनात आहे, मात्र शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत परीक्षाच होत नसल्याने आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाही, त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर तिसरीपासून परीक्षा सुरू करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
सर्वांना विचारात घेऊनच याविषयीचा निर्णय होईल, मात्र याचा अर्थ म्हणजे तिसऱीपासूनच पुन्हा नापासांची पातळी गाठली जाणार किंवा परीक्षेत नापास म्हणजे तिसरीत नापास असा याचा अर्थ काढता येणार नाही असे संदिग्ध उत्तरही केसरकर यांनी दिले आहे.
गृहपाठ बंद करावा असे मला वाटत नाही. फक्त गृहपाठ कोणत्या वर्गापासून द्यावा याचा विचार व्हायला हवा. कारण अगदी बालवाडीपासूनच मुले शाळेतही लिहीतात आणि घरीही लिहीतात. खरेतर शिक्षकांची जबाबदारी ही पुस्तकापलीकडची आहे. मुलांना शिकवणी लावण्याची वेळ आलीच नाही पाहिजे. मुलांनी खेळलेही पाहिजे याकडे लक्ष देण्याची आता आवश्यकता असल्याचे मत केसरकर यांनी व्यक्त केले.
अर्थात गेल्या काही दिवसांतील शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांचा विचार करता, या अत्यंत महत्वाच्या मुद्दयावरही सरकार नेमका काय निर्णय घेते याची मात्र उत्सुकता आहे.