पुणे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्हा परिषद लवकरच आपल्या १००० हुन जास्त शाळा बंद करण्याच्या तयारीत आहे. ज्या शाळांमध्ये २० हून कमी पटसंख्या आहे, अशा शाळा बंद करून त्या शाळेमधील मुलांना जवळच्या दुसऱ्या शाळेत समाविष्ट केले जाणार आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी नुकतेच २० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळांनी माहिती जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. जर कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे शासनाने धोरण प्रत्यक्षात आले तर पुणे जिल्ह्यातील १००० हून जास्त शाळा बंद होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या ३६२९ शाळा असून या शाळांमधून २ लाख ९६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेकडे ११९०० शिक्षक कार्यरत आहेत.
या १००० शाळा बंद झाल्यानंतर या शाळातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी किमान २ ते ३ किलोमीटरची पायपीट करावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांना शाळेत पोचविण्यासाठी काय व्यवस्था करणार याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही. या प्रक्रियेमुळे जे विद्यार्थी शिक्षण सोडून देतील, त्यासाठी शासन काय करणार याबाबतही स्पष्टता नाही. मात्र शाळा बंद करण्याचे धोरण मात्र मांडण्यात आलेले आहे.
खासगी शिक्षणसंस्थांना मोकळे रान देण्यासाठीची ही योजना असल्याची टिका याबाबत नागरिक करत आहेत. प्रथम सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा घसविला, त्यामुळे पटसंख्या कमी होऊन बरेच विद्यार्थी जवळपासच्या खासगी शाळात जाऊ लागले. त्यानंतर आता कमी पटसंख्येचे कारण दाखवून शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. यातून गरीबाच्या मुलांचे शिक्षण बंद पडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.