विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामती शहराध्यक्षपदी काल अचानक जय पाटील यांची निवड करण्यात आली. गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू होत्या. मावळते शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांचा कार्यकाल संपल्यानंतर जय पाटील यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्षपदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी बरेच जण प्रयत्न करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराध्यक्ष पदासाठी जय पाटील या युवा चेहऱ्याला संधी दिली.
जय पाटील यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बारामती लगत असलेल्या तांदुळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी त्यांनी यशस्वीपणे काम करून एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. शेकडो झाडांनी सुशोभित तांदुळवाडी आणि तांदुळवाडी चे बदललेले पर्यावरण हे त्याचे एक उदाहरण आहे. जय पाटील यांनी बारामती नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदीही काम केले आहे.
तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणची मोहीम राबवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची नोंद घेऊन आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बारामती शहराध्यक्षपदी निवड झाली असल्याचे जय पाटील यांनी निवडीनंतर सांगितले. तसेच अजित पवार यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून सर्वांना विश्वासात घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.