मुंबई : महान्यूज लाईव्ह
गांबिया नावाच्या देशात ६६ लहान मुलांचा मृत्यू झालाय. या मुलांच्या मृत्यूचा तपास करत असताना त्यांच्या किडनीवर परिणाम झाल्याने हे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. किडणी बिघडण्याचे कारण या मुलांना देण्यात येणारे कफसिरप असल्याचे सांगितले जात आहे. या कफ सिरपमधील काही घटकांचा या मुलांच्या किडणीवर विपरित परिणाम झाला. परिणामी ही मुले मृत्यूमुखी पडली. या मुलांना जे कफसिरप देण्यात आले होते, ते एका भारतीय कंपनीने बनविलेले होते.
आता जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अलर्ट जारी केला आहे. भारतातील मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड या कंपनीकडून बनविण्यात आलेल्या सर्दी खोकला आणि तापावरील सिरपवरून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रोमेथायझीन ओरल सोल्यूशन, कॉफेक्समेलीन बेबी कफ सिरप, मकॉफ बेबी कफ सिरप आणि मॅग्रीम एन कॉल्ड सिरप अशी या चार कफ सिरपची नावे आहे. ही चारही सिरप हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल कंपनीत तयार होत होती. या सिरपमध्ये आढळलेल्या डायथायलीन ग्याकॉल आणि इथिलिन ग्लायकॉलचा लहान मुलांच्या पोटावर आणि किडनीवर परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियालाही सतर्क केले आहे. त्यामुळे आपल्या मुलांना कफ सिरप देतेवेळी आपण यापैकी कोणते कफसिरप देत नाही ना याची काळजी घ्या. अन्यथा डॉक्टरांचा सल्ला घ्या.