वेदांता प्रकल्प टक्केवारीमुळे गुजरातला गेला या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोपाला अजित पवार यांचे सडेतोड उत्तर!
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय मार्गदर्शन केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलय. त्यांनी त्यांचे विचार सगळ्यांच्या समोर ठेवलेत. हा त्यांचा पार्टी अंतर्गत प्रश्न असल्यामुळे ते ऐकण्याचे सगळ्याना कुतूहुल होते आणि दसऱ्यासारखा महत्त्वाचा दिवस असताना पण सगळ्यांनी ते पाहिलं दोन्हीकडे गर्दी होती. कशी गर्दी होती? काय होती, मिडियाने पण वेगवेगळ्या लोकांना विचारलं, चहा मिळाला का? नाश्ता मिळाला का? जेवण मिळालं का? पाणी मिळाले का?त्यावेळेस काहींनी सांगितलं, आम्हाला कशाला आणलं हेच माहीत नाही. कुणी जेवायचं पण विचारत नाही, कोणी चहाचं विचारत नाही, असं आम्ही ‘टीव्हीवर’ बघितलं अशी उपरोधिक टीका अजित पवार यांनी बारामती मध्ये पत्रकारांची संवाद साधला यावेळी केली.
शिवसेनेनं टक्केवारीनं कमिशन मागितल्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला.असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला यावर महाविकास आघाडीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. टक्केवारी मागितली हा आरोप धादांत खोटा आहे.आरोप करत असाल तर तो सिद्धही करून दाखवा. असं आव्हान अजित पवार यांनी दिलं. केवळ राजकीय टिप्पण्या करायच्या म्हणून काहीतरी बोलण्याला अर्थ नाही, शिंदे सरकारच्या चुकांमुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला असं अजित पवार म्हणाले.
चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली जुलैमध्ये मीटिंग झाली होती. सरकार जूनमध्ये गेले. जुलै मध्ये हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली. त्यात हाच विषय होता. आज राज्यातून वेदांता गेला, मात्र हे सारे त्यांच्या चुकांमुळे घडलं आहे. आज जे सरकार आहे, त्यांच्याच विचाराचे केंद्रातले आणि त्यांच्याच विचाराचे सरकार राज्यांमध्ये आहे. दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. तरुणांचा रोष आपल्यावर येईल हे लपवण्याकरिता त्यांनी हे वक्तव्य केलं असा आरोप अजित पवारांनी केला.
उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आम्ही काय जास्त टीकाटिप्पणी करायचं कारण नाही. कारण एकीकडे आम्ही अडीच वर्ष सरकारमध्ये काम केलं, त्यांच्या नेतृत्वाखाली मी देखील काम केलं अशांचे विचार होते. दुसरीकडे ज्यांनी आत्ताच जूनमध्ये काही वेगळा राजकीय निर्णय घेतला, ते मंत्रिमंडळात वरिष्ठ मंत्री म्हणून काम करत होते. हे राजकीय बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेने विचार करून मतदारांनी विशेषतः शिवसैनिकांनी निर्णय घेताना, आपण काय केलं पाहिजे, पुढची भूमिका काय असली पाहिजे, कोणाच्या पाठीशी उभा राहिले पाहिजे, कुणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे हे ठरवावे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
झेंडा शिवसेनेचा अजेंडा राष्ट्रवादीचा असा आरोप शिंदेंनी कालच्या सभेत केला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, याला काहीही अर्थ नाही. कारण तेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात होता. माझ्या उजव्याच बाजूला ते बसायचे. तेव्हा काही म्हणाले नाहीत. तिथं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही होती. आम्हाला अनेक वर्षांचा वेगवेगळ्या पक्षांना घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे.
अडीच वर्षात जे काही निर्णय घेतले, शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमाफी, विकासाच्या बाबतीत असतील किंवा इतर घटकांबद्दलचे ते सगळ्यांनी मिळून घेतले आहेत. आता ही जी काय वक्तव्य राजकीय स्वरूपाची आहेत, त्याला काय फार महत्व द्यावं असं मला वाटत नाही असे अजित पवार म्हणाले.
तसेच मोठ्या प्रमाणावर दहा कोटी रुपये एसटीला भरून बसेसची व्यवस्था केली होती. सणाच्या दिवशी ही तर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली. बसेसच नव्हत्या.पण अशा गोष्टी करता कामा नये. शेवटी जसा त्यांना त्यांचा मेळावा महत्त्वाचा होता. तशीच ज्या जनतेकरिता गाव तिथे एसटी हे धोरण राबवले गेले. त्या प्रवाशांकरता ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसते किंवा कामाकरिता जायचं असते. त्यांच्याकरिता ही एसटी होती, पण त्याचा कशाप्रकारे वापर झाला अशीही टीका अजित पवार यांनी केली.