दौंड तालुक्यातील लडकत वाडी येथील घटना! अज्ञात शिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी!
दौंड: महान्यूज लाईव्ह
उसाच्या शेताच्या बांधावर शिकारीसाठी जाळे लावून सापळा रचला होता, मात्र बिबट्या त्यात अडकल्याने तडफडून एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील लडकत वाडी येथे घडली आहे.
लडकतवाडी परिसरातील शेतकरी शशिकांत जनार्दन लडकत यांच्या ऊसाच्या शेताच्या बांधावर अज्ञात व्यक्तींनी शिकारीसाठी लोखंडी साखळी जोडलेला पंजा ठोकून सापळा रचला होता. त्यांनी नेमके कोणाच्या शिकारीसाठी हा सापळा रचला असल्याचा अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र त्यांच्या या सापळ्यात एक नर जातीचा बिबट्या अडकुन बळी गेल्याची दुदैवी घटना घडली.
बुधवारी (दि.५) या परिसरातून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी या ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार, दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, वनपाल सचिन पुरी, वनसंरक्षक नानासाहेब चव्हाण, वनरक्षक सुनिता शिरसाट, रमेश कोळेकर, विलास होले, सुरेश पवार, नौशाद शेख आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्याची व परिसराची पाहणी केली. यावेळी अज्ञात व्यक्तींनी शिकारी करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पाय अडकण्याचा ट्रॅप लावल्याने व त्यामध्ये बिबट्याचा पाय अडकून तरफडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, राहु येथील पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विकास अधिकारी अनिल इंगवले यांनी मृत बिबट्याचं शवविच्छेदन केले. हा बिबट्या नर असून त्याच्या शरीराचे अवयव हे निकामी झाले आहेत. तर या बिबट्याचा मृत्यू आठ दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या मृत बिबट्याची पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन करुन विल्हेवाट करणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. संबंधित आरोपींना लवकरच अटक केले जाईल,अशी माहिती पुणे वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांनी दिली.