बारामती महान्यूज लाईव्ह
येथील नटराज नाट्य कला मंडळास नगर परिषदेने दिलेल्या जागेच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती नटराज नाट्य मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.
आज या संदर्भात किरण गुजर यांनी अधिक माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती नगरपरिषदेच्या मालकीची तीन हत्ती चौकालगत मनोरंजनात्मक हेतूकरिता नियोजित असणारी जागा बारामती नगरपरिषदेने ठराव करून सांस्कृतिक क्षेत्रामधील योगदान पाहून नटराज नाट्य कला मंडळाला दिली आहे.
याबाबत बारामती येथील सुरेंद्र श्याम सुंदर जेवरे व राहुल नंदू कांबळे यांनी दोन स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. यामध्ये न्यायालयात बाजू मांडताना याचिकाकर्त्यांनी नटराज नाट्य कला मंडळ ही संस्था अस्तित्वातच नसून संस्थेचे बारामती व परिसरामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे योगदान नाही असे म्हटले होते.
यावर संस्थेच्या वतीने बाजू मांडताना अभिजीत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना नटराज नाट्य कला मंडळाच्या स्थापनेपासून ते कोरोना काळामध्ये केलेल्या कामापर्यंतचा अहवाल पुराव्यानिशी वाचून दाखवला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वऱ्हाळे व किशोर सी. संत या खंडपीठाने नटराज नाट्य कला मंडळाला दिलेली जागा ही योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच देण्यात आल्याचा निष्कर्ष काढत दोन्ही याचिका फेटाळून लावल्या.
याचिकाकर्त्यांच्या वतीने तळेकर अँड असोसिएट्स व ॲड. सुशांत प्रभुणे या वकिलांनी बाजू मांडली होती तर नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
दरम्यान या निकाला संदर्भात किरण गुजर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना अंतिम विजय सत्याचा असतो. नटराज नाट्य कला मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे प्रचंड मोठे आहे गेली ४० वर्ष ही संस्था बारामतीकरांची सांस्कृतिक भूक भागवत आहे. दसऱ्याच्या दिवशी हा निकाल आल्यामुळे आम्हाला आणखी बळ मिळाले आहे असे सांगितले.