सलमान मुल्ला – उस्मानाबाद
कळंब बस आगारातील महिला वाहक मंगल गिरी या महिला वाहकाने चक्क एसटी मध्ये वर्दीवर असताना प्रवास करताना व्हिडीओ रिल्स बनवले व महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याच्या कारणावरून वाहकासह मदत केल्यावरून चालकालाही निलंबित करण्यात आले आहे.
धाराशिव आगाराच्या सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली. मंगल गिरी या एसटी महामंडळाच्या कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असून त्या सोशल मिडियावरही लोकप्रिय आहेत. एक लाखाहून अधिक फालोअर्स त्यांचे इन्स्टाग्रामवर आहेत.
आतापर्यंत तब्बल १ हजार ८७५ व्हिडीओ रिल्स त्यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केले असून या व्यतिरिक्त यूट्यूब चॅनेलही त्यांनी सुरू केले आहे. दरम्यान मंगल गिरी व चालक कल्याण कुंभार या दोघांनाही महामंडळाने निलंबित केले असून चालक कल्याण कुंभार याने ही रिल्स बनविण्यात मदत केल्याचा आरोप यामध्ये आहे,
दरम्यान ही रिल्स बनविण्याच्या प्रकाराबद्दल अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असली तरी इन्स्टाग्रामवरील गिरी या्ंच्या फालोअर्सनी थेट महामंडळाचाच निषेध केला आहे. अगदी नोकरी गेली तेल लावत, तुम्ही व्हिडीओ बनविण्याचे थांबवू नका असाही सल्ला दिला आहे. सध्या या निलंबित प्रकरणाची चर्चा संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात जोरात आहे.