दौंड – महान्यूज लाईव्ह
दुचाकीला ३० लाखांच्या दागिन्यांची पिशवी अडकवून गडी दुकानात सुपारीची पुडी आणण्यासाठी गेला.. याअडकवलेल्या पिशवीत बहादराने तब्बल ३० लाखांचे दागिने ठेवले होते. इतरांना ते माहिती झालेच नसते, मात्र चोरटा लक्ष ठेवूनच होता.. त्याने संधी साधली आणि सुपारीच्या नादात ३० लाखांच्या दागिन्यांना चुना लागला..!
ही घटना दौंड शहरातील शिवाजीनगर चौकादरम्यान घडली. याप्रकरणी नंदकिशोर दगडु विधाते (वय 60 वर्षे, व्यवसाय नोकरी, रत्नत्रय ज्वेलर्स, दौंड, रा. पंचशिल थेटर पाठीमागील बाजु दौंड ता.दौंड) यांनी फिर्याद दिली. त्यावरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.५० ते ५.१५ च्या सुमारास विधाते हे शिवाजीनगर रोडच्या कोपऱ्यावर त्यांची दुचाकी (एमएच ४२ यू ४१२१) ही उभी करून परशुराम अपार्टमेन्टमधील किराणा दुकानात सुपारीची पुडी घेण्यासाठी गेले.
ते परत आले असता त्यांनी दुचाकीला लावलेली पिशवी दिसून आली नाही. या दुचाकीच्या मधील जागेत त्यांनी पिशवी ठेवली होती. या पिशवीत ३० लाख १८ हजार ५०४ रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते. ही पिशवी चोरीला गेल्याचे समजताच विधाते हादरून गेले.
आणि अज्ञात चोरट्याने तब्बल ३० लाखांचा डाव साधल्याचे त्यांच्या व आसपासच्या भागातील नागरिकांच्याही लगेचच लक्षात आले. त्यावरून रात्री साडे आठ वाजता विधाते यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फौजदार श्री. चवरे पुढील तपास करीत आहेत.