महार रेजिमेंटच्या आजी-माजी सैनिकांनी महार रेजिमेंट चा ध्वज हाती घेऊन बावडा गावातून काढली नेत्रदीपक रॅली.! सैनिकांनी हलगीच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला..!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांती काळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळविली आहे. विविध पदके, व पुरस्कार मिळवून देत सैनिकांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. अशा या शूर महार रजिमेंटचा ८१ वा वर्धापन दिन महाराष्ट्रातील अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात आला.
त्या अनुषंगाने बावडा येथे १ ऑक्टोबर रोजी महार रेजिमेंटचा ८१ वा वर्धापन दिन व बावड्यात ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच हा महार रेंजिमेंटचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय लष्करातील महत्वाचे सैन्यदल अशी महार रेजिमेंट ची ओळख आहे.
या रेजिमेंटची १ आँक्टोबर १९४१ मध्ये बेळगाव येथे स्थापना झाली. राजा-महाराजांच्या काळातही महार समाजातील सैन्य हे अतिशय कणखर आणि शौर्यवान असल्याच्या नोंदी आहेत. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता. त्यानंतर जनरल के. व्ही. कृष्णराव हे महार रजिमेंटचे पहिले जनरल होते व ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल देखील होते.
दुसऱ्या महायुद्धात महार सैनिकांनी मोठी कामगिरी केली. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांती काळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळविली आहे. महार रेजिमेंटने ९ युध्दक्षेत्र सन्मान आणि १२ रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत.
१ परमवीर चक्र, १ अशोक चक्र, ९ परम विशिष्ट सेना पदक, ४ महावीरचक्र, ४ कीर्तीचक्र, १ पद्मश्री, ३ उत्तम युध्द सेवा पदक, १६ अतिविशिष्ट सेवा पदक, ३० वीरचक्र, ३९ शौर्य चक्र पदक, २२० सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने २ चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच २ आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे.
अशा या शूर महार रजिमेंटचा दि १ रोजी ८१ वा वर्धापन दिन महाराष्ट्रातील अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात आला. महार रेजिमेंटच्या आजी -माजी सैनिकांनी महार रेजिमेंटचा ध्वज हाती घेऊन बावडा गावातून रॅली काढली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महार रेजिमेंट जवान यांनी काढलेल्या भव्य रॅलीत महिला, मुली, तसेच शहीद झालेले जवान यांचे माता, पिता, पत्नी यांनी देखील सहभाग घेतला. वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन मेजर शामराव कांबळे यांच्या वतीने निवस्थानी करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सुभेदार महादेव माने,सुभेदार तानाजी मोरे, मेजर गौतम वीर, मेजर बाळू खंडागळे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महार रेजिमेंट सैनिकांनी हलगीच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभेदार रामचंद्र, व सुदाम सौदडे (हवालदार) होते.
सामाजिक कार्यकर्ते भिमराव कांबळे यांच्या उपस्थितीत देशासाठी शहीद झालेल्या वीर माता,वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुभेदार रामचंद्र,यांचा सन्मान कँप्टन विजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला महार रेजिमेंट ८१ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शालेय मुलामुलींना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व महार रेजिमेंट यशसिध्दी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी महार रेजिमेंटचे जवान सुभेदार रामचंद्र, प्राचार्य डी आर घोगरे, वैष्णवी खंडागळे, सुभेदार माने यांनी महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहासाबदल आपल्या मनोगतातून माहिती दिली. महाराष्ट्रातील लोकप्रिय गायक विजय सरतापे यांचा भिमगीतांचा कार्यक्रम पार पडला..