सोलापूर- महान्यूज लाईव्ह
सोलापूर जिल्ह्यात अशा काही घटना का घडतात हेच कोडे कळेनासे झाले आहे. पाण्यात बुडून, उडी मारून, घसरून मरण्याच्या घटना जणू नित्याच्या बनाव्यात अशाच झाल्या आहेत. मात्र ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कुळसुंब येथे विवाहितेने दोन मुलांसह उडी मारून आत्महत्या केली.. पण या घटनेचे सर्वात धक्कादायक सत्य म्हणजे याच विहीरीत पाच वर्षापूर्वी या घरातील पहिल्या सुनेने दोन मुलींसह आत्महत्या केली होती.
कुळसुंब गावातील रोहिणी उर्फ अनुराधा बाबासाहेब काशिद ( वय २२ वर्षे) व तिची दोन मुले यामध्ये दोन वर्षांचा अनिष व चार महिन्याची अक्षरा या मुलांचा विहीरीत पडून मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे कौटुंबिक छळातून झाल्याचा आरोप करीत मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिली.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. ३०) बाबासाहेब काशिद हा कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास रोहिणीने तिच्या मुलांना घेऊन विहीरीत उडी मारली.
या तिघांनी विहीरीत उडी मारल्याचे उशीरा समजल्यानंतर परिसरात धावपळ उडाली. अखेर आसपासचे विजेचे पंप आणून विहीरीचे पाणी काढण्यास सुरवात झाली. संध्याकाळी चारच्या सुमारास पाणी निघाल्यानंतर तिघांचे मृतदेह आढळून आले आणि तेथे परिसरात एकच आरडाओरडा झाला.
विशेष म्हणजे २० जुलै २०१७ रोजी याच कुटुंबातील अनुराधा बाबासाहेब काशिद या पहिल्या सुनेने तिच्या दोन मुली आदिती व अक्षरा यांच्यासह याच विहीरीत अशाच पध्दतीने उडी मारून आत्महत्या केली होती. पाच वर्षानंतर पुन्हा अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान रोहिणी हिचे वडील दिलीप शिंदे यांनी बार्शी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पती बाबासाहेब काशीद, रोहिणीची सासू छबाबाई काशिद व एक संशयित बाबासाहेब शिंदे या तिघांना अटक केली. या तिघांना न्यायालयाने ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.