रुग्ण हक्क परिषदेच्या अध्यक्षानेच केली दवाखान्याची फसवणूक! ६० लाखांची खंडणी मागून अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी.. उमेश चव्हाण व अपर्णा साठेवर गुन्हा दाखल
पुणे महान्यूज लाईव्ह
पुण्यात रुग्ण हक्क परिषद नावाची संघटना चालवून त्या संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षाचे बिंग पोलिसांनी फोडले आहे. परवानगी नसताना हॉस्पिटल चालवून ५० ते ६० लाखांचा गैरव्यवहार करून अॅट्रोसिटीची धमकी देणाऱ्या उमेश चव्हाण याच्यासह अपर्णा साठे हिच्यावरही कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात मोहसीन नबी खान (रा. साईबाबानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली. मोहसीन खान याचे मालकीचे हॉस्पिटल व ब्लू नाईल हॉटेलनजिकच्या इराणी हॉटेलमध्ये २०२१ ते २२ दरम्यान वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे खान यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार चव्हाण याने मोहसीन खान याचा दवाखाना विकत घेण्याचा व्यवहार केला होता. यानंतर दवाखान्याती रितसर परवानगी नसतानाही चव्हाण याने प्रतिष्ठित क्षेत्रातील लोकांना आमंत्रित करून दवाखान्याचे उदघाटन केले. दवाखान्याच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या नावावर पैसे उकळले.
दवाखान्यातील मेडीकल स्टोअर, प्रयोगशाळा यांच्या भरमसाठ अनामत रकमा घेऊन दवाखान्यातच एक बॅंकही सुरू केली. दवाखान्याच्या नावावर ५० ते ६० लाख रुपये उकळल्यानंतर ते पैसे खान यानेच द्यावेत असा दबाव खान याच्यावर चव्हाण याने टाकला व ते पैसे त्याने दिले नाहीत, तर त्याच्यावर अॅट्रोसिटी करण्याची धमकी दिली.
महापालिकेकडून कारवाई न करण्यासाठी खान याच्याकडूनच ६० लाखांची मागणी केल्याने शेवटी खान यांनी पोलिस ठाणे गाठले, मात्र पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यामध्ये आदेश दिल्यानंतर पोलिसांनी चव्हाण व साठे या दोघांवर गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.