पुणे – महान्यूज लाईव्ह
पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तपास कमी व अडचणी वाढू न देण्याच्या बदल्यात १ लाखांची लाच मागणारा फौजदार अमोल पाटील व जुन्नर तालुका बार असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या अॅड. केतनकुमार पडवळ वकीलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अमोल पाटील याला पथकाने अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या दोघांनी लाच मागितल्याचे केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले, मात्र प्रत्यक्ष सापळा रचून त्यांना लाच घेताना कारवाई होऊ शकली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या दोघांवर कारवाई केली.
जुन्नर तालुक्यात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये अशी मदत करणारी चुकीची प्रवृत्ती अलिकडे पोलिस ठाण्यांमध्ये दिसून येत असल्याने पुणे जिल्ह्यात या घटनेची चर्चा झाली. हा वकील जुन्नर तालुका बार असोसिएशनचा अध्यक्ष असल्याचे समजते.
विशेष म्हणजे ही लाच मागितली ती देखील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी! जुन्नर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा मागील वर्षी दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समरी रिपोर्ट तत्कालीन फौजदाराने पाठवला, त्याची बदली झाली. मात्र त्रुटी असल्याने हा अहवाल परत आला. तो अहवाल आता अमोल पाटील याने पाहून या गुन्ह्यात आणखी एक कलम वाढू शकते अशी भिती घालून ही लाच मागितली होती. यात मी मध्यस्थी करतो असे अॅड. केतनकुमार पडवळ याने सांगितले व मध्यस्थी केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला होता.