दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील वाखरी येथे गायरान व गावठाणाच्या जागेत घरे बांधून अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत, ग्रामपंचायत प्रशासनाने ही अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली, मात्र धनदांडग्यांच्या अतिक्रमणांना अभय देत फक्त गोरगरिबांच्या अतिक्रमांना कारवाई करण्यास सुरुवात केल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान खासगी मालकीच्या जागेत बांधकाम करणाऱ्यांवरही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत ग्रामस्थ गुलाब जगताप यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाखारी या भागात गायरान व गावठाणाच्या जागेत अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली आहेत. ग्रामपंचायतीने यातील कुटुंबांना शासकीय मालमत्ता कराच्या नोंदी केल्या आहेत. ही अतिक्रमणे करून बराच कालावधी लोटला आहे.
मात्र सध्या काहींनी मागील काही दिवसांपासून मिळेल त्या सरकारी जागेत बांधकाम करून अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. यामध्ये काही राजकीय मंडळी व धनदांडग्याचा समावेश होता. दरम्यान याची चर्चा वाढू लागताच ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली, मात्र यात राजकारण आणून आपल्या गटाविरोधात राजकारणात भाग घेणाऱ्यांना लक्ष्य करून पक्षपाती धोरण आखून अतिक्रमण काढली.
दरम्यान जगताप यांनी मी माझ्या खासगी मालकीच्या जागेत घराचे बांधकाम करीत असताना ग्रामपंचायत प्रशासन जाणूनबुजून अडथळा आणून कारवाई करीत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने खरं तर सर्वच अतिक्रमणधारकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे,मात्र राजकीय द्वेषातुन व वैयक्तिक द्वेषातून ही कारवाई केली जात असल्याचे त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान याबाबत ग्रामसेवक विकास झाडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, नियमानुसार ही कारवाई सुरू असून ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्या संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यात तथ्य नाही. या कारवाईत प्रशासनाकडून ना कोणाला अभय दिले जात आहे. ना कोणताही भेदभाव केला जात आहे असे त्यांनी सांगितले.