राजेंद्र झेंडे ,महान्यूज लाईव्ह
दौंड : पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने दौंड तालुक्यातील केडगाव व दापोडी परिसरातील गुळ उत्पादकांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत ५ लाख ३३ हजार ८७० किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखरेचा साठा जप्त केला.
ही माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह. आयुक्त संजय नारागुडे यांनी दिली. दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळामध्ये भेसळयुक्त गुळ व साखरेचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे मागील काही दिवसांपासून येत होत्या.
त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने दौंड तालुक्यातील बोरीपार्धी, केडगाव व दापोडी परिसरातील गुळ घरांवर छापा सत्र सुरू आहे. यापूर्वीही या विभागाने सतत कारवाई करूनही गूळ उत्पादक हे साखर आणि मुदतबाह्य चॉकलेटचा वापर करीतच होते.
आता ही माहिती मिळाल्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तीन महिला अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी (दिनांक ३०) दापोडी आणि केडगाव येथील तीन गुळ उत्पादन करणाऱ्या गुऱ्हाळांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सुमारे ४ लाख ३३ हजार ८७० किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखरेचा साठा जप्त केला आहे.
यामध्ये सचिन गृह उद्योग दापोडी (मालक गणेश मोहिते) , सुपरस्टार गुळ उद्योग (दापोडी) या गुऱ्हाळ चालकांकडून भेसळयुक्त गुळांचे नमुने व भेसळकारी पदार्थ, साखरेचे नमुने तसेच उर्वरित ५१ हजार ३० रुपये किंमतीचे १४५८ किलो भेसळुक्त गुळ व ५१ हजार किंमतीचा पंधराशे किलो साखर साठा जप्त करण्यात आला.
तसेच केडगाव येथील समर्थक गुळ उत्पादक (मालक अमोल मेमाणे) येथील गुळ घरावर भेसळुक्त गुळ नमुने व भेसळकारी पदार्थ, साखरेचा नमुने व उर्वरित १० हजार ९६० किलो भेसळुक्त गुळ, ३ लाख ७२ हजार ६४० रुपये व ५९ हजार दोनशे रुपये किंमतीची १८५० किलो साखर साठा जप्त करण्यात आला.
तर बुधवारी ( दि.२८) ही बोरीपार्धी येथील महाराज गुळ उद्योग उत्पादक च्या गुळ घरावर २८ हजार ८०० रुपये भेसळयुक्त गुळ व साखरेचा साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती नारागुडे यांनी दिली.
दरम्यान, भेसळयुक्त गुळ उत्पादन करणाऱ्या गुऱ्हाळ चालक व मालकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने अन्न व औषध प्रशासना विभागाकडून लवकरच विशेष मोहीम राबवण्यात येणार असून गैरप्रकार आढळून येणाऱ्या गुऱ्हाळ घरावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील गुळ उत्पादकांनी आवश्यक परवाना घेऊन व सर्व नियमांचे पालन करून गुळ उत्पादन करण्याच्या आवाहन संजय निरागुडे यांनी केले आहे. राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त परमिलसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या महिला अधिकारी क्रांती बारवकर, शुभांगी करणे, अर्चना झांजुर्णे, अन्नसुरक्षा अधिकारी रमेश माझीरे ,वाहन चालक अविनाश थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बाब नागरिकांच्या लक्षात आल्यास त्वरित १८००२२२३६५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी .आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन सह. आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे.