उस्मानाबाद – महान्यूज लाईव्ह
या राज्यात बंडखोरीला थारा नाही. गद्दारीला तर नाहीच नाही, त्यामुळे बंडखोर आज सत्तेत आहेत, ते कायम सत्तेतच राहतील असे नाही.. पवारसाहेबांनीही खूप संघर्ष केला आहे, त्यामुळे काळजी करू नका, संघर्षाचा खूप मोठा इतिहास आपल्या पाठीशी आहे असा दिलासा अजितदादांनी उध्दव ठाकरेंना दिला.
उस्मानाबाद दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पहिल्यांदाच दसरा मेळाव्याचा उल्लेख करीत आपण अगोदर उध्दव ठाकरे यांची सभा ऐकणार असल्याचे सांगत त्यांचे विचार हे महाराष्ट्राला पुढे नेणारे, एकसंघ ठेवणारे व जातीय सलोख्याचे असतात असे आवर्जून सांगितले.
अजित पवार म्हणाले, सत्ता काही सतत एकालाच मिळते अशे नाही. त्यामुळे जे सत्तेत आहे, त्यांनी हुरळून जाऊ नये व सत्तेत नसलेल्यांनीही खचू नये. सध्या शिवसेनाप्रमुख व शिवसेनेची अडचणीची स्थिती आहे. मात्र संघर्षाची तयारी ठेवावी. नारायण राणेंनी बंड केले. त्यांना जनतेने नाकारले. राहूल मोटे तीनवेळा निवडून आले, तेही पडले होते.
राहूल मोटे, राणाजगजितसिंह यांना काही कमी पडू दिले नव्हते. मात्र ते सोडून गेले. म्हणून पवारसाहेब खचले नाहीत. परिस्थितीशी त्यांनी दोन हात केले आणि पुन्हा हिंमतीने आमदार निवडून आणले. त्यामुळे उध्दव ठाकरेंनी काळजी करण्याचे कारण नाही. मोठा इतिहास आपल्या पाठीशी आहे.
शरद पवार यांनी राज्याच्या राजकीय इतिहासात शिल्पकार चव्हाण यांच्यानंतर महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. ३३ टक्के महिलांचे आरक्षण, शेतीत क्रांती असे अनेक निर्णय त्यांनी घेतले. मात्र निवडणूकीच्या काळात मते मागायची व जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करायचे हा प्रघात काहीजण पाडू पाहताहेत, त्यामुळे जनतेने वेळीच सावध व्हावे.
शिंदे सरकार तर फक्त घोषणांचा पाऊस पाडतेय, मात्र स्थानिक परिस्थिती काय याकडे पाहतच नाही. त्यांच्याकडे आदर तर सोडाच, मात्र गुंडगिरी एवढी की, बघून घेतो, तोडतो, कापतो. मराठ्यांना खाज सुटली आहे अशी विधाने दररोज ऐकायला मिळत आहेत अशी टिका पवार यांनी केली.