सातारा – महान्यूज लाईव्ह
कामातुरानाम न भयम न लज्जा किंवा प्यार किया तो डरना क्या.. उक्तीपासून गीतापर्यंत आपल्याकडे अनेक ओव्या प्रेमासाठी प्रचलित आहेत. मात्र सातारा जिल्ह्यातील करंजे येथील तामजाईनगर येथील भागात विचित्रच प्रकार घडला.
सध्या राज्यभरात मुले चोरणारी टोळी आल्याच्या अफवा पसरत आहेत. त्यातून अनेक प्रसंगही घडत आहेत. अगदीच काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये तर साधूंनाच मारहाण करण्यात आली.
काल मात्र सातारा जिल्ह्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे जे प्रेम चोरून ठेवायचे होते, तेच सगळ्या जगापुढे उघडे पडले. साताऱ्यातील करंजे येथील तामजाईनगर येथे एक बुरखाधारी व्यक्तीने शाळेचा पत्ता विचारला. तेथील दुकानदाराला थोडा संशय आला. कारण शाळेचा पत्ता अनोळखी महिला का विचारते म्हणून त्याने जरा खोदून खोदून चौकशी केली
आणि त्याला धक्काच बसला. ही बुरखाधारी व्यक्ती नुसतीच अनोळखी नव्हती, तर बुरख्याच्या आड चक्क पुरूष होता. मग तर त्याची सटकलीच. त्याने लगेच इतरांना बोलावून घेतले आणि मुले चोरणारी टोळी असल्याचे इतरांना सांगताच काहीही विचार न करता असा त्या मजनूला धुतला की, विचारूच नका.
मग गावात बातमी पसरली.. सगळेजण त्या मूल चोरणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला पाहण्यासाठी येऊ लागले आणि आल्यानंतर आपला हात साफ करू लागले. मग नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात या प्रियकराला दिले.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात ही वरात पोचल्यानंतर मग पोलिसांनीही त्यांचा खाक्या त्याला दाखवला आणि आता पोटात आणि ओठात काहीच राहिले नसल्याने त्याने सारेच ओकून बाहेर काढले. प्रेयसीला भेटण्यासाठी ही शक्कल वापरल्याचे सांगत त्याने प्रेयसीचाही पत्ता दिला आणि तोही विवाहित व त्याची कथित प्रेयसीही विवाहित असल्याची माहिती लगेच बाहेर पडली.