दिल्ली महान्यूज लाईव्ह
कुत्रा हा खूप इमानदार असतो, असे म्हणतात.. पण जेव्हापासून भारतात ही परदेशी पिलावळ आलीय, ती अजूनही माणसाळायला तयारच नाही.. पिटबूल जातीच्या कुत्र्याची एक दहशतीची घटना समोर आली असून या पिटबूल कुत्र्याने चक्क १२ जणांवर जिवघेणा हल्ला करीत त्यांना चावा घेतला. तब्बल १५ किलोमीटर हा कुत्रा पळत होता, या पळण्याच्या घटनेत त्याने पाच गावं पालथी घातली. शेवटी गावकऱ्यांनी त्याला ठार मारलं..
पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यातील दिनानाथनगर परिसरात ही घटना घडली. दिनानाथनगर परिसरातील तंगोशा गावातील पिटबूल अचानक पिसाळला. पिसाळल्यानंतर तो धावत सुटला. तंगोशा गावातून शेजारच्या चोहाना गावापर्यंत त्याने धाव घेतली.
या दरम्यान त्याने ६० वर्षीय शेतकऱ्यापासून ते मजूरापर्यंत व अनेक कुत्र्यांनाही चावे घेतले. त्यातही काही जणांना गंभीर जखमी केले. ६० वर्षीय या शेतकऱ्याला चावताना या कुत्र्याने मोठी दहशत माजवली.
अखेर चोहाना गावातील निवृत्त सेनाधिकारी कॅप्टन शक्तीसिंह यांनी त्याला पकडून त्याच्या तोंडात काठी घातली व त्यांच्या मदतीला आलेल्या इतर शेतकऱ्यांनी मग हातातील लाठ्यांनी पिटबूल कुत्र्याला जीव जाईस्तोवर मारले.