पाटस – कानगाव रस्त्यावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट रस्त्यावर पडून वाढले जीवघेणे अपघात!
राजेंद्र झेंडे , महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस रेल्वे स्टेशन परिसरात सुरू झालेल्या सिमेंट कंपन्या आता स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सिमेंट कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील सिमेंट हे पाटस – कानगाव रस्त्यावर ठिकठिकाणी इतरत्र पडते आणि त्यातून दुर्घटना घडताहेत.
असे सिमेंट पडून या रस्त्यावरून ये -जा करणारे स्थानिक नागरिक शेतकरी व विद्यार्थी यांची दुचाकी वाहने व विद्यार्थ्यांच्या सायकली घसरुन पडून अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. या सिमेंट कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दिनांक २९) रात्री ही वाहने अडवून रस्ता रोको केला. या प्रकारमुळे ह्या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मागील काही महिन्यांपूर्वी ही पाटस – कानगाव रस्त्यावर सिमेंट कंपनीच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून सिमेंट पडत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या असल्याचे सविस्तर वृत्त महान्यूज लाईव्ह प्रसिद्ध केले होते.
मागील काही दिवसांपासून पावसाची सतंतधार सुरू आहे. अशावेळी रस्त्यावर पडलेले सिमेंट आणि पावसाचे पाणी यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रबडी तयार होऊन रस्ते घसरगुंडीसारखे गुळगुळीत झाले आहेत.
त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या दुचाकी व इतर वाहने घसरून पडून अपघात होत आहेत. अखेर पाटस रेल्वे स्टेशन परिसरातील संतप्त तरुण व ग्रामस्थांनी सिमेंट कंपनीच्या ये-जा करणारी वाहने अडवून रास्ता रोको केला. त्यामुळे या ठिकाणी बराच वेळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, ह्या सिमेंट कंपन्यांना पाठीशी घालणाऱ्या काही राजकीय मंडळांनी लगेच या ठिकाणी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांऐवजी हेच काही गाव पुढारी ह्या कंपनीची बाजू घेत चर्चा करू, परत असं होणार नाही अशी सारवासारव करीत असल्याचे चित्र होते.
या घटनेची माहिती मिळतात पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, पोलीस हवालदार भानुदास बंडगर, पोलीस शिपाई समीर भालेराव आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान दोन-तीन दिवसांपूर्वी नागेश्वर विद्यालयात कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी काही गावपुढारी मात्र या सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करत असल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे राजकीय पाठबळामुळे आणि कंपनीकडून आमिषाला बळी पडलेल्या काही गावपुढाऱ्यांमुळे या सिमेंट कंपनीवर ठोस अशी कायदेशीर कारवाई होईल याबाबत नागरिकांना शंका आहे.
काही गाव पुढाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे आज या सिमेंट कंपन्या स्थानिक नागरिकांच्या जीवावर उठल्या असून त्याचे गंभीर परिणाम सध्या ग्रामस्थांना भोगावे लागत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, श्री सिमेंट कंपनीचे अधिकारी मिलिंद घोगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की यासंदर्भात चर्चा केली असून हा संपूर्ण रस्ता पाण्याने धुवून काढण्यात येईल आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता व काळजी घेतली जाईल.