दौंड : महान्यूज लाईव्ह
मुलांनो, अनोळखी व्यक्तींच्या जवळ जाऊ नका, त्यांनी काय खाण्यास दिले तर ते घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचे की तुम्ही घाबरू नका. पोलीस तुमच्या सोबत असुन तुमच्या सुरक्षेतेची जबाबदारी आमची आहे. असे आश्वासन दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना व पालकांना दिले.
दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजेगाव व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुसेगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना पळून नेण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. या प्रकारांमुळे तालुक्यातील शालेय विद्यार्थी व पालक वर्गामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शाळांना भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
घुगे म्हणाले की, झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा छडा लावून संबंधितांना जेरबंद केले जाईल, मात्र विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता धाडस दाखवण्याची आवश्यकता आहे. कोणावरही शंका व संशय वाटल्यास त्वरित पोलीस पाटील, अथवा पोलिसांशी संपर्क साधा.
विद्यार्थ्यांनी कोणाकडूनही चॉकलेट अथवा खेळण्याची वस्तू घेऊ नये व कोणी सोबत चल म्हटले तरी ते अनोळखी असतील, तर त्यांच्यासोबत जाऊ नये. तसेच अनोळखी व्यक्तींच्या गाडीला हात करून शाळेत जाऊ नये. फक्त घरातील किंवा आपल्या नातेवाईक शेजारी व ओळखीचे कोणी असेल तर त्यांच्या सोबत जावे.
शाळेत जाताना शाळेच्या आवारात व घराच्या बाहेर खेळताना दक्षता व काळजी घेण्याचे आवाहन घुगे यांनी यावेळी केले. तसेच नागरीकांनी तरुणांनी, पालकांनी व शिक्षकांनी याबाबत जागृत राहावे, विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना घाबरून न सोडता दक्षता व काळजी घ्यावी अशा सूचना ही यावेळी पोलीस निरीक्षक घुगे यांनी केल्या.