बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 65 वी वार्षिक सभा आज प्रचंड गाजली. या सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. सत्ताधारी व विरोधकांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जी मेहनत घेतली होती, ती अभूतपूर्व गोंधळात दिसून आली. आज माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्राला नवीन दहा गावे जोडण्याचा विषय आवाजी मताने सत्ताधाऱ्यांनी मंजूर करून घेतला, मात्र हा विषय मंजूर झाला नसल्याचे सांगत नाही नाही अशा घोषणा देत विरोधक मात्र तिथेच थांबून राहिले. दरम्यान या सर्व गोंधळात व्यासपीठावरील गाद्या तक्के देखील फेकण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील दहा गावे नव्याने जोडण्याच्या संदर्भात विरोधकांकडून जनजागृती केली जात होती. दुसरीकडे विरोधकांकडून केली जाणारी तयारी पाहून सत्ताधाऱ्यांनी देखील यासंदर्भात सभासदांमध्ये सकारात्मक जनजागृती करण्याचा प्रयत्न चालू ठेवला.
आज त्याची परिणिती पहिल्या विषयापासूनच दिसून आली. छोट्या छोट्या विषयावरून सभासदांमध्ये उडत असलेले खटके पाहून सभेमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती. पहिल्या विषयापासून सात विषयापर्यंत फार चर्चा नव्हती, परंतु या दरम्यानच्या काळात योगेश जगताप या संचालकांच्या नावावरून उडालेला गोंधळ आणि त्यानंतर वेळोवेळी ठराविक वक्त्यावरून त्यांच्या विषयावरून सभेमध्ये गोंधळ उडत होता.
परंतु याचा कळस गाठला तो आठव्या विषयाने! या आठव्या विषयात माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्राला नवीन दहा गावे जोडण्याचा विषय होता. यामध्ये अनेक सभासदांनी ही गावे जोडू नयेत, अगोदरच मंगल कार्यालय, शिक्षण संस्था व कारखाना यावरती दबाव येतो. अनेक सभासदांना ऊस जाळावा लागतो, अशा परिस्थितीमध्ये ही गावे अजिबात जोडू नयेत, एकीकडे कालव्याला अस्तरीकरण करायचा निर्णय घेतला जातो आणि दुसरीकडे जिरायती भागातील गावे जोडली जातात यामागे राजकारण असल्याचा मुद्दा देखील विरोधक सभासदांनी मांडला.
त्यावर सत्ताधारी सभासदांनी या कारखान्याच्या स्थापनेपासूनचे मुद्दे मांडले. ही गावे जोडणे कसे क्रमप्राप्त आहे, याची माहिती देण्यास सुरुवात केली आणि तिथूनच हळूहळू तणावाला सुरुवात झाली. विरोधी बाजूकडून असलेले सभासद हे सत्ताधारी बाजूकडून बोलणाऱ्या वक्त्यांना बोलू देत नव्हते.
एवढा तणाव वाढत चालला होता आणि अचानक मंजूर मंजूर असा शब्द करत काही सभासद उठले आणि त्यानंतर प्रचंड घोषणाबाजीला सुरुवात झाली. गर्दीमध्ये काहीजण मंजूर म्हणत होते, तर काहीजण नाही नाही असे म्हणत होते. जवळपास पाच ते सात मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्यानंतर व्यासपीठावरील तक्के देखील फेकण्यात आले.
या गडबडीत व गोंधळात सत्ताधाऱ्यांनी हा विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले आणि त्यांनी सभा संपल्याचे जाहीर करत तिथून निघून गेले. त्यानंतर मात्र विरोधकांनी तेथेच थांबून नाही नाही चा घोष केला आणि माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांनी विरोधकांची प्रतिसभा त्या ठिकाणी घेतली.