शिरूर- महान्यूज लाईव्ह
न्हावरे (ता.शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या गोंधळात पार पडली.
गेली दोन वर्षे कोरोना महामारीनंतर प्रथमच कारखाना कार्यस्थळावर ऑफलाइन पद्धतीने सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. कारखाना अडचणीत असताना व निवडणूक प्रक्रिया स्थगित असताना गेल्या काही दिवसांपासून आरोप कारखान्याच्या कारभारावरून दोन्ही बाजूने आरोपांच्या फैरी सुरू होत्या.त्याचप्रमाणे येणाऱ्या निवडणुकीमुळे या सर्वसाधारण सभेला विशेष महत्व होते.
घोडगंगा कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरवातीला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करून सभेला सुरवात झाली. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले. आमदार अशोक पवार यांचे प्रास्ताविक सुरू असतानाच विरोधकांनी कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी प्रास्ताविक लवकर उरकावे. वेळेत विषय पत्रिकेतील विषय घ्यावेत असे सांगितल्याने सभेमध्ये गोंधळ सुरू झाला.
दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने अखेर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचून दाखवण्यास सुरुवात केली. गोधळातच सर्व विषयांला मंजूरी देण्यात आली. दरम्यान माईकवर बोलण्यासाठी दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शांततेचे आवाहन केले. असा गोंधळ सुरू असतानाच राष्ट्रगीत घेण्यात आले.
दोन्ही बाजूने काही वेळ घोषणाबाजी सुरू होती. सभा आटोपल्यानंतरही सभासद त्याच जागी असल्याने दोन्ही बाजूने पुन्हा माईकचा ताबा घेऊन भाषणे सुरू करण्यात आली.
घोडगंगा कारखान्याबाबत कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांनी बोलताना सांगितले की, घोडंगंगा साखर कारखाना अडचणीत असतानाही कारखान्याने एफआरपीची रक्कम पूर्ण केली आहे. एफआरपी रक्कम देताना उशीर झालेला असतानाही उस उत्पादक सभासदांनी प्रशासनाला सहकार्य केले.
मागील युतीच्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प वेळेत सुरू करण्यासाठी उशीर झाल्याने कारखान्याला नाहक कोट्यावधी रुपयांचा अर्थीक भुर्दंड सोसावा लागला आहे.
विरोधक कारखान्याच्या कर्जाबाबत सभासदांची दिशाभूल करत असून कारखान्यावर कुठल्याही प्रकारचे थकीत कर्ज नाही. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष हे उपाध्यक्ष असताना कारखान्याचा वजनकाटा ऑनलाइन पद्धतीने झाला असून तरीही ते काटा ऑनलाइन करा असा खोटा प्रचार करत आहेत.
सहवीज निर्मिती प्रकल्पाचे सुमारे 75 कोटी रुपयांचे कर्ज कारखान्याने आतापर्यंत फेडले आहे. शासनाने वीज खरेदी करार कमी दरात मंजूर केल्याने कारखान्याचे सुमारे प्रकल्प चालू झाल्यापासून सुमारे सोळा कोटी रूपयांचा कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. तसेच उस खरेदी कर अनुदान माफ न झाल्याने कारखान्याला सुमारे 75 कोटीचा अर्थीक भुर्दंड बसला आहे.
विरोधक बाजारभावाबाबत घोडगंगाची तुलना ज्या कारखान्याशी करत आहेत, त्याच कारखान्यांनी २५ वर्षांपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस नेल्यानंतर फक्त सहाशे रुपयांपैकी दोनशे रुपये देऊन सभासदांची प्रचंड लूट केली आहे. कारखान्याने सभासदांना एफआरपीची रक्कम दिली याबाबत आता विरोधकांच्या पोटात का दुखत आहे? असा खडा सवाल ही आमदार अशोक पवार यांनी उपस्थित केला.
शासनाने जाहीर केलेल्या एफआरपी कर्जावरील व्याजाची पाच कोटी बत्तीस लाख रुपये रक्कम कारखान्याला अद्याप मिळालेली नाही. राज्य बँकेचे अधिकारी अनास्कर व देशमुख यांनी कारखान्याला अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत केली.
कारखान्याने यंदाच्या हंगामाची तयारी जोरदार केली असून त्यासाठी ऊसतोड करणाऱ्यांना कारखान्याने उचल देऊ केली आहे. सध्या कारखान्याकडे एक लाख 39 हजार 38 क्विंटल साखर शिल्लक असून त्याची 43 कोटी दहा लक्ष रुपये इतकी किंमत असल्याची माहिती पवार यांनी दिली.
यावेळी बोलताना दादा पाटील फराटे म्हणाले की, घोडगंगा कारखान्याची ३१ वी सर्वसाधारण सभा नियमाप्रमाणे व विषय पत्रिकेप्रमाणे कामकाज व्हावे अशी आमची मागणी होती. आपल्या कारखान्याची सभा ही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवली तरी हरकत नाही, परंतु अध्यक्षांनी सर्व विषयांचे उत्तरे द्यावीत अशी आमची मागणी होती.
कारखान्याचा आर्थिक अनागोंदी कारभार सुरू असून कामगारांचे ७ महिन्यांचे पगार थकले आहेत.पंधरा दिवसात कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा ठप्प आहे. सहा हजार सभासद मयत असूनही त्यांच्या वारसांना सभासद करून घेतले नाही. दिवाळीला ५० ते ७० किलो साखर मिळत होती पण तिचे प्रमाण कमी होऊन ती २० किलो मिळत आहे. कर्ज का वाढले ते न सांगता एक ते नऊ विषय कारखान्याच्या अध्यक्षांनी न वाचता मंजूर करून घेतले.
यावेळी काँग्रेसचे पुणे जिल्हासरचिटणीस महेश ढमढेरे म्हणाले की, कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील विषय चर्चेत घेतले नाही. घोडगंगा साखर कारखाना हा ऑडिट वर्ग “अ” मध्ये होता. परंतु कारखाना “ब” वर्गात का गेला याचे लेखापरीक्षण दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
ऑडिटला उत्पादन क्षमता, वाहतूक, कामगार, खरेदीची पूर्तता करणे गरजेचे आहे. कारखान्याचे अध्यक्ष अकार्यक्षम असून बिगर सभासद ही कारखान्याला ऊस घालतात. त्यांनाही सभासद करून घेणे गरजेचे आहे.कारखान्याचे वजन काटे ऑनलाइन नाहीत.
वजनकाटा ऑनलाईन केल्यास सभासदांनाही कोणी कारखान्यास ऊस दिला आहे याची माहिती होईल. कारखान्याच्या सभासदांनी बाहेरील काट्यावरून वजन करून आणले तर सदर गाडीचे वजन दोन दिवस न करता गाडी तशीच थांबून ठेवली जात आहे व त्या सभासदाची ऊसतोड बंद केली जाते. त्यामुळे कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन होणे गरजेचे आहे.
ॲड.सुरेश पलांडे म्हणाले की, घोडगंगाची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी व ऐतिहासिक झाली. २१ कोटी ५४ लाख ६६ हजार कारखान्याला तोटा झाला आहे. कर्ज रक्कम वजा 222 कोटी ने खालावलेली आहे.पहिला हप्ता २२०० ने दिला असून ४०७ रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले एक ते नऊ विषय मंजूर म्हणून सर्व विषय मंजूर करून घेतले व राष्ट्रगीत सुरू केले
यावेळेस सभासदांनी प्रति सभा सुरू केली. दीड तास सभा सुरू ठेवून सभासदांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केली नाही. कारखान्याच्या अध्यक्षांची सभा बंद पडल्यानंतर अध्यक्षांनी कोणालाही बोलू दिले नाही. अध्यक्षाचा यावेळी सभासदांनी निषेध केला.
खाजगी कारखाना, विस्तारीकरण न करणे कमी गाळप केल्याने सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. कारखाना तोट्यात गेला आहे. तो का गेला आहे याची कारणे अध्यक्षांनी सांगितली नाहीत. सभेत अध्यक्ष गोंधळ घालतात ही अध्यक्षांची ही नेहमीचीच पद्धत आहे. अध्यक्षांनी घोळ घालून सभा पूर्ण केली नाही. खाजगी कारखान्यामुळे घोडगंगा कारखाना तोट्यात गेला आहे. त्यामुळे ऊस सभासदांचा ऊस शिल्लक राहत असतो.
दरम्यान या सभेला कारखान्याचे सभासद,सत्ताधारी व विरोधी गटातील सर्व पदाधिकारी तसेच तालुक्यातील राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.