राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : केमिकलयुक्त गुळ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या गुऱ्हाळांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरातील आतापर्यंत तीन गुऱ्हाळांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी दिली.
दरम्यान या धाडींमुळे दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ चालक, मालकांचे धाबे दणाणले आहेत. थोड्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाने केमिकलयुक्त व भेसळयुक्त गुळ तयार करणाऱ्या गुऱ्हाळावर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील अनेक गुऱ्हाळावर धाड टाकण्यास सुरवात केली आहे.
केडगाव परिसरातील तीन गुऱ्हाळांवर धाड टाकून गुळाचे नमुने व त्यात वापरणाऱ्या पदार्थांचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत नेऊन तपासणी केले जाणार आहेत. एका गुऱ्हाळावर तर चक्क गुळ तयार करताना पाल आढळून आली, तर काही ठिकाणी गुळात साखर व इतर पदार्थ टाकून गुळ तयार केली जात असल्याने यावेळी निदर्शनास आले.
हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असून त्यानुसार ठोस व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त संजय निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी शुभांगी करणे, अर्चना झुंजारगे,क्रांती बारवकर व कर्मचारी रमेश मांजरे, अविनाश थोरात आदींच्या पथकाने ही धाड टाकून कारवाई सुरू केली आहे.