संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार – जगप्रसिद्ध लोणार सरोवरात नवरात्रोत्सवात कमळजा मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे. दर्शनसाठी विदर्भासह मराठवाड्यातील भाविकांचीही गर्दी होत असते. लोणार सरोवरातील दाट वनराईत कमळजा मातेचे हेमांडपंथी मंदिर आहे. कमळजा माता ही भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. कमळजा देवी मंदिरासमोर सासू-सुनेची विहीर आहे.
यातील सर्वात मोठे विशेष म्हणजे या विहिरीचे अर्ध्या बाजूकडील गोड तर अर्ध्या बाजूकडील पाणी खारट आहे. कोरोनाच्या संकटकाळात सदर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी कमळजा देवीचे मंदिर खुले करण्यात आले आहे. परंतु वन्यजीव विभागाच्या वतीने भाविकांसाठी विशेष नियमावली जारी केली असून दर्शनासाठी सरोवरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वन्यजीव अभयारण्य लोणारच्या वतीने करण्यात आले आहे.
लोणार सरोवरातील कमळजा माता देवीचे मंदिर हे जवळपास १ हजार वर्षे जुने आहे. विदर्भ- मराठवाड्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कमळजा मातेच्या दर्शन कोरोनानंतर पहिल्यांदाच घेता येणार असल्याने भाविकांमध्येआनंदी वातावरण आहे.
मंदिर सरोवरातील अभयारण्य क्षेत्रात असल्याने या जंगलातून पायी चालतच जावे लगाते. या क्षेत्रात जंगली प्राण्यांचा मुक्त संचार असतो त्यामुध्ये प्रामुख्याने बिबट् ,कोल्हे, तडस यासारखे हिस्त्र प्राणी तसेच विषारी साप सुध्दा असल्याने भाविकांनी सकाळी ६ वाजेनंतरच सुर्यप्रकाश असतांना दर्शनासाठी तेही गटागटाने जावे लागते. त
वनविभागाने नेमून दिलेल्या पायवाट रस्त्याचाच वापर करावा, सोबत कुठल्याही प्रकाच्या प्लास्टिक कॅरिबॅग नेऊ नये, नोंदणी करूनच सरोवरात प्रवेश करावा, लहान मुले स्त्रीया, वृद्ध व्यक्तींनी आपल्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेणाऱ्या व्यक्ती सोबतच दर्शनासाठी जावे, जाताना येताना आरडा-ओरड करु नये, वन्यप्राण्यांना किंवा पक्षांना त्रास होईल असे वर्तन करु नये, आवाहन वनविभाग आणि वन्यजीव विभागाकडून केले जाते.
आताही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांसाठी वन्यजिव विभागाच्या वतीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुनच भाविकांनी कमळजा माता दर्शनासाठी यावे, असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन राठोड यांनी केले आहे.