संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार – दोन वर्षांपूर्वी चिंचोली सांगले येथील चोरी गेलेला ट्रॅक्टर लोणार पोलिसांनी शेतकरी असल्याचे भासवत वेषांतर करून शोधून काढला. फक्त ट्रॅक्टरच नाही, तर ट्रॅक्टरचोरही अगदी सहजपणे जाळ्यात अडकवत ताब्यात घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी फिर्यादी पांडुरंग ओंकार सांगळे यांचा महिंद्रा ५७५ डी आय कंपनीचा ट्रॅक्टर व सोनालिका कंपनीचा रोटाव्हेटर दिनांक ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२० दरम्यान घरासमोरून चोरीला गेला होता.
त्याबाबत लोणार पोलीस स्टेशनला ट्रॅक्टर चोरीची तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध लोणार पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. या घटनेला तब्बल दोन वर्षे होत आली, दरम्यान सांगळे यांच्या नातेवाईकासाठी जुना ट्रॅक्टर खरेदी करायचा म्हणून हे सांगळे यांचे नातेवाईक वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लोणी खुर्द येथे खरेदीसाठी गेले होते.
तेथे समाधान नाथराव सोनुने (वय २६ वर्ष) याने सांगळे व त्यांच्या नातेवाईकांना हाच ट्रॅक्टर विक्रीसाठी दाखविला. सांगळे यांना धक्काच बसला, हा ट्रॅक्टर आपलाच असल्याचे त्यांनी ओळखले व त्यांना उद्या पैसे घेऊन येतो असे सांगितले व घडलेल्या प्रकाराची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना सांगितली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपले सहकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे, हवालदार रामकिसन गीते, नितीन खरडे, गजानन डोईफोडे, कृष्णा निकम ज्ञानेश्वर निकस यांना आरोपी व ट्रॅक्टर ताब्यात घेण्याबाबत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी लोणार पोलिसांनी शेतकरी असल्याचे भासवत वेषांतर करून लोणी खुर्द येथे आरोपीकडे ट्रॅक्टर विक्रीबाबत चर्चा केली यावेळी आरोपीने मढी शिवारात असलेल्या एका शेतामध्ये सदर ट्रॅक्टर दाखवला.
ट्रॅक्टर दाखवताच लोणार पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याजवळ असलेले चोरीचे ट्रॅक्टर व रोटाव्हेटर लोणार पोलीस स्टेशनला आणून जमा केले. आरोपीला २८ सप्टेंबर २०२२ रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, एक दिवसाची कोठडी देण्यात आली.
या चोरीच्या प्रकरणात त्याच्यासोबत चोरी करण्याकरता किती साथीदार आहेत व लोणार तालुक्यातून आतापर्यंत चोरी गेलेल्या ट्रॅक्टरचा उलगडा होण्याची शक्यता आहे व या ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीची साखळी कुठपर्यंत आहे हे तपासअंती कळेल. पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुरज काळे, नितीन खरडे करीत आहेत