दौंड – महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील चोरी, सासवड हद्दीतील बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल पाच वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास यवत पोलीसांनी बारामती तालुक्यातील वढाणे येथून सापळा रचून जेरबंद केले, अशी माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
सतिश हिरामण शिंदे (वय २६ रा.वढाणे, ता.बारामती जि. पुणे ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळगावगाडा येथे २ ऑक्टोबर २०१७ रोजी गणेश साधू करे यांची घरफोडी करून ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तेव्हापासून हा आरोपी फरार होता. बारामती तालुक्यातील वढाणे येथे हा आरोपी येणार असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी ( दि. २९) वढाणे येथे सतिश शिंदे याला पकडण्यासाठी वेशांतर करून सापळा रचला होता.
मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तो डोंगरात पळून जात असताना या पोलीस पथकाने त्याचा दोन किलोमीटर पाठलाग करून पकडले. या आरोपीवर सासवड पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम ,गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, गणेश कुतवळ, पोलीस हवालदार सचिन गायकवाड व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली.