दिवेगावकर यांच्या बदलीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण
सलमान मुल्ला, जिल्हा प्रतिनिधी उस्मानाबाद
उस्मानाबाद : कोरोनाच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची अचानक व तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दुसरीकडे उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती राज्याचे प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी केली असून मावळते जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली पुण्यातील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामविकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक या रिक्त पदी करण्यात आली आहे.
डॉ ओंबासे हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेज येथून ते एमबीबीएस झाले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पहिली नियुक्ती आहे.
मंत्री तानाजी सावंत व दिवेगावकर यांच्यात वाद
आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचे प्रकरणी खुद्द आरोग्यमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी यांची राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती..
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिवेगावकर हे नवरात्रात 29 सप्टेंबरपासून सुट्टीवर गेले होते. त्यातच त्यांच्या बदलीचे आदेश धडकल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.