राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
पुण्याच्या पीएमपीएलच्या हडपसर ते पाटस – कुरकुंभ या बसला राज्य परिवहन महामंडळाने आक्षेप घेत तक्रार केल्लाने ही बस सेवा मागील तीन चार महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थी, शेतकरी व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांनी पीएमपीएलच्या हडपसर ते पाटस – कुरकुंभ या बसचे उद्घाटन केले होते. काही दिवस ही बस नियमित सुरू होती. मध्यंतरी पाटस टोल प्लाझा कंपनी टोल आकारणी केली जात असल्याने व आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण पुढे करीत पीएमपीएलच्या व्यवस्थापकांनी ही बस सेवा बंद केली.
कुरकुंभ, पाटस, रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे कुसेगाव, कानगाव, जिरेगाव या भागातील विद्यार्थी, शेतकरी या बसने नियमित प्रवास करीत होते. ही बस सेवा बंद झाल्याने पाटस परिसरातील शिक्षणासाठी वरवंड व पुण्याला जाणारे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसची वाट बघत ताटकळत बसावे लागते तर इतर मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत पीएमपीएलचे वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले की, पाटस – कुरकुंभ बस बाबत राज्य परिवहन विभागाने आक्षेप घेतला असून एसटी बस चे आर्थिक नुकसान होत आहे, पीएमपीएलच्या हद्दीतीच बससेवा सुरू ठेवावी अशी तक्रार केली. त्यामुळे ही बससेवा बंद करण्यात आली असून फक्त पीएमपीएलच्या हद्दीतच ही बस सेवा नियमित सुरू आहे.
पाटस ग्राम विकास फाऊंडेशनचे कार्यकर्ते हर्षद बंदिष्टी म्हणाले की, पाटस ग्रामविकास फाउंडेशन ने पाठपुरावा करून ही बससेवा चालू झाली होती. परंतु कोणतेही ठोस कारण न देता ही बससेवा बंद करण्यात आली, परिसरातील विद्यार्थी, पालक,जेष्ठ नागरिक, व्यापारी यांची मोठी गैरसोय होत आहे. ही बस सेवा त्वरित सुरु करावी याबाबत आमदार राहुल कुल,माजी आमदार रमेश थोरात, खासदार सुप्रिया सुळे व पीएमपीएलचे संबंधित अधिकारी यांच्याकडे पुन्हा पाठपुरावा,वेळ पडल्यास आंदोलन ही केले जाईल.
सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नितीन शितोळे म्हणाले की, वरवंड ते पाटस हे अंतर फक्त ६ किलोमीटर आहे व pmrda पीएमआरडीए च्या हद्दीपासून ( कौठीचा मळा) ते पाटस बस थांबा फक्त अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे किमान पाटस पर्यंत तरी ही बस सुरू करावी.