विपुल पाटील, बारामती.
हातामध्ये केशरी, पिवळ्यां आणि काळ्या रंगाचे अनेक धागे गुंडाळून, कपाळाला भस्म लावून तो ऑफिसमध्ये आला. त्याचं ऑफिसमध्ये येणं-जाणं तसं जूणचं होतं. कामाच्या निमित्ताने तो नेहमी यायचां. परंतु या अवतारात आणि अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्याला आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. त्याची नजर एका जागी ठरतच नव्हती.
त्याला थोडा शांत केला आणि पाणी देऊन बोलतं केलं.तो म्हणाला “मला लागीर झालयं. माझा स्वतःवरचा कंट्रोल सुटलायं. प्रत्येक गोष्टीत नुकसान होतयं. मी एक गोष्ट ठरवली की माझ्या हातून दुसरीच होतेयं.ऐन तीशीत मला सतत थकवा आल्यासारखा वाटतोय. अनेक बुवा,बाबा, #मांत्रिक बघितले पण फरक पडत नाहीये. माझ्यामध्ये घुसलेली ही #भूतं शेवटी मला घेऊनच जातील.”तो त्रस्त होता, निराश होता.
मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत असल्याने त्याला हे सर्व खोटं कसं आहे आणि हा प्रॉब्लेम मानसिक कसा आहे? हेच समजावून सांगत होतो.मी पूर्ण क्षमतेने त्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत होतो. परंतु सर्वच प्रयत्न व्यर्थ जात होते. त्याला एकेदिवशी फोर्सफुली डॉक्टरांकडे जायला सांगितले.
मानसोपचार तज्ञ डॉक्टरांनी त्याला सांगितले. ‘पृथ्वीवरची लोकं आता चंद्रावर गेलेत, विज्ञान खूप पुढे गेलयं. हे सर्व भंपक आहे, असे असतानाही तू कशाला या भानगडीत अडकतोस. हे सर्व केवळ मनाचे भ्रम आहेत.’ एवढं ऐकूनही परिणाम शून्यच. याउलट त्याने डॉक्टरांकडे जाणे बंद केले. मात्र मांत्रिक बुवाबाबांकडे जाणे आणि पैसे घालवणे सुरुच होते.
एके दिवशी काहिसा त्रागा करतच तो ऑफिसला आला. मी ठरवले आज या गोष्टीचा सोक्षमोक्षच लावूयात. मी गाडी घेतली आणि त्याला सांगितले, चल आज देवीच्या मंदिरात जाऊन येवू. वाटेत एक स्मशानभूमी होती. त्याची इच्छा नसतानाही..! मी तिथे थांबलो.आतमध्ये गेलो. जिथे प्रेताला जाळतात, त्या ग्रेव्हयार्डवर बसून स्वतःच्या सेल्फी घेतल्या.
त्यालाही माझे एकदोन फोटो काढायला लावले. त्याला थोडेसे धाडस आले मग त्याने स्वतःही तिथे बसून स्वतःच्या सेल्फी घेतल्या. सारं काही सुरळीत सुरू होतं. त्याला खूप भारी वाटत होतं. परंतु अचानक त्याला पोटात मळमळायला लागल्यासारखं वाटलं. डोकं गरगरायला लागलं.
एकही शब्द न बोलता उलट्या काढू लागला. तीन-चार वेळा त्याने उलटी करण्याचा प्रयत्न केला पण त्याला उलटी होत नव्हती. मी काही विचारले तर हातानेच थांबण्याची खूण करत होता. शेवटी मी जबरदस्तीने विचारलंच नक्की काय होतयं. तो म्हणाला “ही जागा खूप चांगली आहे. या उलटीतून माझ्या आतील चार भूतं निघाली. फक्त एक राहिलयं. ते #मुस्लिम आहे. अजून थोडा वेळ बसू कदाचित तेही निघून जाईल.”
त्याचे उत्तर ऐकताचं मला हसावं की रडावं ते काहीच कळत नव्हतं. परंतु मी केलेली मात्रा लागू पडत होती इतकचं. काही वेळ थांबून आम्ही तिथून निघून आलो. मागच्या काही दिवसांपासून तो अगदी सुव्यवस्थित आहे. कुठल्यातरी गोष्टीमुळे त्याला फरक पडलाय असं तो बोलतो. खुप खूशही आहे. तो असाच खूशही रहावा आणि शतायुषीही व्हावा परंतु आता जेव्हा कधी त्या स्मशानभूमीतील सेल्फीचा विषय निघतो तेव्हा मात्र आम्ही पोट दुखेपर्यंत खळखळून हसतो…!