बारामती – महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्याला हादरवणारी ही बातमी आहे यवत पोलिस ठाण्यामधून.. २१ सप्टेंबर रोजी दौंडच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार २८ सप्टेंबर रोजी रात्री यवत पोलिस ठाण्यात बारामतीचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी व सध्याचे पुण्यातील उपायुक्त नारायण शिरगावकर, पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, फौजदार पद्मराज गंपले व मोरगावचा माजी सरपंच पोपट उर्फ कैलास तावरे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने मोठी खळबळ उडाली असून न्यायालयाच्या आदेशाचे वृत्त सर्वप्रथम महान्यूज लाईव्हने दिले होते. त्यानुसार काल दिवसभर बऱ्याच घडामोडी घडल्या. तक्रारदार आरती लव्हटे व किरण भोसले यांच्या वतीने पुन्हा नव्याने फक्त गुन्हा दाखल नको, तर आरोपींना अटकेचे आदेश व्हावेत अशी मागणी झाल्यानंतर पोलिस दलाचीही चक्रे वेगाने फिरली.
रात्री यवत पोलिस ठाण्यात अखेर वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भादवि कलम १६७, १९२, १९९, १९८, १९७, २००, २१७, २१८, ४२०, ४०९, ४६४, ४१८, १२० (ब) (दौंड न्यायालयाचा आदेश) यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल रात्री किरण शांताराम भोसले ( रा. जोगवडी, ता. बारामती) यांनी यवत पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी ही फिर्याद घेऊन वरील गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपासही पवार हेच करीत आहेत.
बारामती तालुक्यातील शेतजमीनीच्या खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्यानंतर मुख्य आरोपीला पोलिसांनी वाचविण्याचा प्रयत्न केला व त्याच्यावर गुन्हा शाबित होत नाही असे सिध्द करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार घेऊन दौंड न्यायालयात वरील पोलिस अधिकारी व आरोपी पोपट तावरे याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने वरील आदेश दिला होता.
त्याची अंमलबजावणी यवत पोलिसांना करावी लागली आहे, याप्रकरणात अॅड. राजेश कातोरे, अॅड. अमित काटे व त्यांचे सहायक संदीप येडे यांनी किरण भोसले व आरती लव्हटे यांच्या वतीने काम पाहिले. दौंडच्या न्यायदंडाधिकारी श्रीमती जे.एस. खेडेकर-गोयल यांनी यासंदर्भातील आदेश दिला होता.