सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
सध्या जनावरांच्या लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा त्यांचे काम करीत आहेच, मात्र त्याला हातभार म्हणून पशुव्यवसाय विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या अधिकाऱ्यासह औषध दुकानदारांनी गोपालका्ंसाठी स्वयंस्फूर्तीने आपलाही मदतीचा हातभार लावला.
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर २ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पराडे, भिगवण येथील गणेश मेडीकल या दुकानाचे मालक गणेश हगारे, प्रगती मेडिकल दुकानाचे मालक जितेंद्र धोका, शहाजीनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मरगळ, ग्राहक पंचायतीचे अॅड. मुकूंद निंबाळकर यांनी आज २५ हजार रुपये किंमतीची लंपी स्किन आजारावर उपयुक्त ठरणारी औषधे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे सूपूर्त केली. यावेळी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील हेही उपस्थित होते.
प्रांताधिकाऱ्यांनी या सामाजिक बांधिलकीचे व संवेदनशीलतेचे कौतुक करीत अशाच सामाजिक बांधिलकीमुळे अनेक आपत्तीवर मात करण्याला बळ मिळते असे कांबळे यांनी सांगत या औषधांचा वापर जनावरांसाठी होईल आणि त्याचा दिलासा गोपालकांना निश्चित होईल असे मत व्यक्त केले.