दौंड : महान्यूज लाईव्ह
या महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लागला आहे. याच पुरोगामी विचारातून कर्मवीर भाऊराव पाटील यांची जडणघडण झाली आहे. कर्मवीर अण्णांच्या कष्टातून आणि त्यागामुळेच आज बॅरिस्टर, वकील, डॉक्टर इंजिनिअर तसेच विविध क्षेत्रात अधिकारी निर्माण झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं झाले आहे. असे प्रतिपादन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वक्ते प्रशांत खामकर यांनी केले आहे.
दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री नागेश्वर विद्यालयात बुधवारी (दि.२८) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून खामकर हे बोलत होते.
याप्रसंगी पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, मेल्झर केमिकल कंपनीचे सुनील शिंदे, क्लीन सायन्स कंपनीचे अशोक भुप,विनामॅक्स कंपनीचे विकास टोपले, हलाईट्स केमिकल कंपनीचे संकेत निरगुडकर,श्री सिमेंट कंपनीचे मुकेश पुरोहित, विद्यालयाचे प्राचार्य बी. आर.लोखंडे तसेच शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खामकर म्हणाले की, सत्यशोधक समाज चळवळीतूनच रयत शिक्षण संस्थेचा जन्म झाला आहे. बहुजनांच्या, शेतकऱ्यांच्या, वंचित घटकांच्या, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे याकरिता ४ ऑक्टोंबर १९१९ ला कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था सुरू केली.
आज ही संस्था राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. या संस्थेत आज अठरापगड जातीचे विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करीत आहेत. त्याकाळी कर्मवीरांनी आर्थिक परिस्थिती नसतानाही बहुजनांच्या ,गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्याची, त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी आश्रमशाळा काढून केली होती.
सत्यशोधक चळवळीत त्यांचा नेहमीच सहभाग राहीला. राजर्षी शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करायचे. संत गाडगेबाबा महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनीही कर्मवीर अण्णांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करून त्यांना शैक्षणिक कार्यासाठी मोलाची मदत केली होती.
आज एक लक्षात घेतले पाहिजे की, महापुरुषांची जयंती डीजे लावून व नाचून साजरी करण्यासाठी नाही, तर त्यांचे कार्य व विचार डोक्यात घेऊन ती वाचून साजरी करण्याची आवश्यकता आहे. महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल करावी.
सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनीही विद्यार्थ्यांना शिस्त, कायद्याचे व नियमांचे पालन करणे का आवश्यक आहे ? अवतीभवती घडणारे प्रसंग, मोबाईल तसेच सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच एक आदर्श विद्यार्थी ते एक अधिकारी होण्यासाठी कष्ट आणि त्याग करावे लागेल याबाबत विविध दाखले व अनुभव सांगत वाबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.