दौंड: महान्यूज लाईव्ह
पाटस येथील पाचवीत शिकणारा विद्यार्थी कुसेगाव येथील भानोबा विद्यालयात शाळेत जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी चॉकलेट दाखवून जवळ बोलावले. मात्र ते अनोळखी असल्याने विद्यार्थी घाबरून प्रसंगावधाने पळून गेला, मात्र त्याच्या सांगण्यानंतर हा अपहरणाचा प्रयत्न असल्याचा संशय काहींनी व्यक्त केला. दरम्यान, या घटनेबाबत कुसेगाव ग्रामपंचायतीने यवत व पाटस पोलिसांना याबाबत पत्रव्यवहार केला असून या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की , पाटस परिसरातील मोटेवाडा येथील इयत्ता पाचवीतील एक विद्यार्थी सायकलवरून मोटेवाडा येथुन कुसेगाव येथील भानोबा विद्यालयात मंगळवारी (दि.२७) सकाळी दहा- साडेदहा वाजता शाळेत जात असताना अचानक उसाच्या शेतामधून दोन अनोळखी व्यक्ती तोंड बांधलेले व काळा ड्रेस घातलेले समोर येऊन चॉकलेट दाखवून त्याला धर म्हणत होते.
त्यांची भाषा या विद्यार्थ्यांला समजत नव्हती, त्यामुळे हा विद्यार्थी घाबरून पळून गेला असे या मुलाने सांगितले. दरम्यान संबंधित घडलेला प्रकार या विद्यार्थ्याने शाळेत व पालकांना सांगितला. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालक वर्ग चिंतेत असुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कुसेगाव येथील भानोबा विद्यालयात पाटस व कुसेगाव परिसरातील वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. मात्र पाचवीच्या विद्यार्थ्याने सांगितलेल्या या प्रकारामुळे इतर विद्यार्थी व पालक वर्ग घाबरले आहेत. साहजिकच ही लहान मुलांना पकडणारी टोळी आल्याची चर्चा या परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, ह्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल, पालकांनी कोणत्यांही अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणावर संशय आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी केले आहे.