जळगाव, सोलापूर – महान्यूज लाईव्ह
कितीही लाचखोरीच्या बातम्या आल्या, तरी भ्र्ष्टाचाराची किड वाळवीसारखी एवढी फोफावलीय, ती आटोक्यात यायचं नावच घेत नाही.. सोलापूर जिल्ह्यातील सदाशिवनगर येथे महावितरणचा अभियंता १५ हजारांच्या लाचखोरीत आणि जळगाव जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र विभागाचा अधिकारी ३२ हजारांची लाच घेताना पकडला गेला.
नवीन वीज मीटर बसवून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महावितरणच्या शाखा अभियंत्याने ही लाच मागितली होती. १५ हजार रुपये स्विकारताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सुमीत गुलाबराव साबळे (वय २७ वर्षे, रा. रणजित काळे बिल्डींग दहीगाव रोड, नातेपुते, ता. माळिशरस, जि. सोलापूर) याला रंगेहाथ पकडले.
यातील आश्चर्याची बाब म्हणजे हा अभियंता केवळ २७ वर्षाचाच आहे आणि त्याची लाचखोरीची तक्रार करणाराही तक्रारदार २७ वर्षांचाच आहे. थोडक्यात नोकरीला लागताच खोऱ्याने पैसे ओढायचे या ध्येयानेच जणू हा साबळे महावितरणमध्ये नोकरीला लागला होता की काय अशीच शंका आता येऊ लागली आहे.
दुसऱ्या घटनेतच जळगाव जिल्ह्यात थेट वजनमापे वाला अधिकारीच तब्बल ३२ हजारांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई एश.एस. बिबे अॅण्ड सन्स या पेट्रोलपंपाच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात केली.
सुनील रामचंद्र खैरनार (वय ५६ एसएमआयटी कॉलेजजवळ, मुक्ताईनगर) असे या वजनमापे निरीक्षकाचे नाव आहे. या पंपाच्या चार मशीन्स स्टॅम्पिंग करून प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारी शुल्काशिवाय खैरनार याने ३२ हजारांची मागणाी केली होती.
त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यावर एसीबीने त्याची पडताळणी केली, तेव्हा यामध्ये खैरनार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून सापळा रचण्यात आल्यानंतर पंपाजवळच्या मोकळ्या जागेत लाच स्विकारताना खैरनार याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
हे दैवा… एकीकडे नोकरीला फक्त २ वर्षे झालीत, दुसरीकडे फक्त २ वर्षे राहीलीत..!
या दोन सापळ्यातील एक कमालीचे अंतर व गंभीर बाब म्हणजे ५६ वर्षे आयुष्याची झाली, अगदी निवृत्तीला दोन वर्षे उरली, तरीही एखाद्या अधिकाऱ्याचे पोट भरत नाही… अन दुसरीकडे नोकरीला लागून उणीपुरी दोन वर्षेही झाली नाहीत, तोच पोट प्रचंड उपाशी असल्याचा आण आणत खोऱ्याने पैसे घेण्याची मनिषा बाळगणारा युवा अधिकारी महाराष्ट्राला पहायला मिळाला. त्यामुळे भ्रष्टाचाराचा महाराक्षस फक्त कुंपण खात नाही, कुंपणातील शेत, शेतातील पिके आणि माती, उरलेसुरले शेणही खातोय असेच म्हणावे लागेल..!