राजेंद्र झेंडे: महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील तेल उत्पादक करणाऱ्या कारगिल कंपनीने पर्यावरणाला घातक व मोठ्या प्रमाणात प्रदूषण केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने या कंपनीला नुकतीच नोटीस बजावली आहे.अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी सर्जेराव भोई यांनी दिली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील काही रासायनिक कंपन्या रासायनिक मिश्रित सांडपाणी कंपनीच्या आवारात तसेच पावसाळ्यात पावसाच्या पाण्यात सोडतात अशी तक्रार अनेकदा होते. या भागातील नागरिकांनी याबाबत अनेक वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. या औद्योगिक वसाहतीमधील कारगिल (प्लंट क्रमांक ई – ४५ ) या तेल उत्पादक घेणाऱ्या कंपनीत २ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी, नियंत्रक व महालेखा परिक्षक यांनी या कंपनीला भेट देऊन परिसराची पाहणी केली होती. त्यावेळी या कंपनीमध्ये घातक कचरा, गाळ आणि सांडपाण्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावले नसल्याचे निदर्शनास आले.
दुसरीकडे या कंपनीने दुरुस्ती अर्ज प्रदूषण नियंत्रण महामंडळाला केलेला नाही, तसेच कंपनीने कचरा आणि गाळाची साठवण नियमांनुसार केलेली नाही, कंपनीने सांडपाणी संकलनसाठी योग्य टाकी केली नाही, कंपनीने तेल आणि ग्रीस साठवण जुन्या टाकीमध्येच साठवणूक केली असल्याचे यावेळी निदर्शनास आले.
त्यामुळे प्रदूषण नियंत्रण विभागाने दिलेल्या अटींचे व नियमांचे पालन कारगिल कंपनीने केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कारगिल कंपनीने पर्यावरणास घातक व प्रदूषण करीत असल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळांनी ठेवला असुन याबाबत कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत तशी नोटीसही या कंपनीस नुकतीच बजविण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपल्या कंपनीचे उत्पादन प्रक्रिया त्वरित बंद करण्याचे निर्देश का दिले जाऊ नये? संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश का दिले जाऊ नये? याबाबत सात दिवसाच्या आत खुलासा करण्याचे आदेश या नोटीस द्वारे देण्यात आले आहेत. तसेच येत्या ३० सप्टेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुणे येथील कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देशही दिले आहेत, अशी माहिती प्रदूषण विभागाचे अधिकारी सर्जेराव भोई यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी कारगिल कंपनीच्या प्रदूषण बाबत १ सप्टेंबर रोजीचा व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करीत या कंपनीवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यानुसार ह्या कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावली आहे. अशी माहिती भोई यांनी दिली.